आरटीओतील लेखनिकांचे काम बंद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीओतील लेखनिकांचे 
काम बंद आंदोलन
आरटीओतील लेखनिकांचे काम बंद आंदोलन

आरटीओतील लेखनिकांचे काम बंद आंदोलन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : सरकारने आरटीओतील विभागीय आकृतीबंधास मान्यता दिली. त्या संबंधीचा शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२२ रोजी निर्गमित झाला. मात्र, अद्याप आकृतिबंध निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड नाराजी व संतापाची लाट उमटली आहे. त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी सोमवारी निदर्शनासह पिंपरी-चिंचवड विभागातील उपप्रादेशिक परिवहन अंतर्गत असलेल्या मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेतील २२ कर्मचाऱ्यांनी लेखनीबंद आंदोलन केले. परिणामी, दोन तास शासकीय कामकाजाचा खोळंबा झाल्याने नागरिक वैतागले होते.
आकृतीबंधास सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, आकृतिबंध निर्णय अद्याप लागू केला नाही. यामागील कारणे काय आहेत याची योग्य माहिती दिली जात नाही. सहभागी कर्मचाऱ्यांची नाराजी अशी होती की, आकृतिबंध व पदोन्नतीचे निर्णय लागू झाल्यानंतर पदोन्नती सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाकडून लेखी देण्यात आले आहे. परंतु, पदोन्नती देण्यासंदर्भातील प्रक्रिया मंदावलेली आहे. नावाला काही पदोन्नत्या झाल्या. परंतु, त्याला आवश्यक असणारे पदोन्नती सत्र म्हणता येणार नाही. वर्ग-२ पदोन्नत्या गेल्या ६-७ वर्षांपासून रखडल्या आहेत. परिवहन आयुक्तांकडे बैठका झाल्या. काही सिद्ध झाले नाही. पदोन्नतीपात्र कर्मचारी कमालीचे नाराज आहेत.
राज्यात सर्व कार्यालयांमध्ये कामकाजाची पद्धत योग्य व एकाच पद्धतीने होत नसल्याने संघटनेने कामकाजातील सुसूत्रीकरणासाठी मागणी केली. त्यानुसार कळसकर समितीचे गठण झाले त्याचा अभ्यासपूर्ण अहवालही प्रशासनास २०२० मध्ये सादर झाला आहे. परंतु, त्याचीही अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामकाज करताना नाहक अडचणी व कारवाईस सामोरे जावे लागत आहे. याचा त्रास सर्वसामान्य जनतेलाही मोठया प्रमाणावर होत असल्याचे संघटनांतील कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे सांगितले.