
‘कार्यक्षेत्राला योगदान देणारे करिअर करा’ ः प्रा. विजय नवले.
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ९ : आवड, क्षमता, पात्रता ही करिअरची त्रिसूत्री असून करिअर हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. मी कोण होणार यापेक्षा मी काय करणार या गोष्टीला महत्त्व देताना. मला काय मिळणार यापेक्षा मी कार्यक्षेत्राला काय देणार याचा विचार करून, कार्यक्षेत्राला योगदान देणारे करिअर करा असे प्रतिपादन करिअर सेवा डॉटकॉमचे संचालक प्रा. विजय नवले यांनी केले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, मावळ नागरी सहकारी पतसंस्था आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला करिअर घडवूया, दहावी-बारावीनंतर पुढे काय’ या विषयावर व्याख्यान दिले.
यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, क्लबचे अध्यक्ष विन्सेंट सालेर, तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मण मखर, कार्यवाह देवराम पारिठे, सोनबा गोपाळे, दशरथ जांभूळकर, मिलिंद शेलार, सुदाम दाभाडे, विलास टकले, पांडुरंग पोटे, शमशाद शेख, रेणू शर्मा, सुनील खोल्लम, श्रीनिवास गजेंद्रगडकर, सोपान असवले, संजय वंजारे, संतोष मालपोटे, संदीप मगर उपस्थित होते. संतोष खांडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात खांडगे म्हणाले, दहावी-बारावीनंतर पुढे काय करायचे या बाबत अनेक विद्यार्थी अनभिज्ञ असतात. त्यांना वेळीच मार्गदर्शन मिळाले तर पारंपारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन करिअरच्या अनेक संधी मिळू शकतात. संतोष खांडगे व मान्यवरांच्या हस्ते प्रा. नवले यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. सत्यजित खांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी व गणेश ठोंबरे यांनी केले. लक्ष्मण मखर यांनी आभार मानले.
PNE23T41865