बालविवाह प्रकरणी आई वडिलांसह सासरच्यांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालविवाह प्रकरणी आई वडिलांसह सासरच्यांवर गुन्हा
बालविवाह प्रकरणी आई वडिलांसह सासरच्यांवर गुन्हा

बालविवाह प्रकरणी आई वडिलांसह सासरच्यांवर गुन्हा

sakal_logo
By

हिंजवडीत बालविवाह प्रकरणी
पालकांसह सासरच्यांवर गुन्हा
पिंपरी : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लाऊन दिला व तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने मुलगी गर्भवती राहिली. ही बाब लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांसह, सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला. याप्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आई, वडील, सासू, सासरे, पती, नणंद, नंदावा आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना तिचा विवाह लाऊन दिला. त्यानंतर पतीने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती राहिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

महिलेची २४ लाखांची फसवणूक
महिलेला काम देतो, असे आमिष दाखवून अनोळखी इसमाने महिलेची २४ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २ ते ५ मे या कालावधीत काटेवस्ती, पुनावळे येथे घडला. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला व्हॉट्सॲपवर अनोळखी व्यक्तीने संपर्क केला. फिर्यादी यांना काम देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. वेळोवेळी लिंक पाठवून अधिक पैसे, बोनस देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांत २४ लाख ३८ हजार ७० रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीला कोणताही नफा अथवा काम न देता त्यांची फसवणूक केली. रावेत पोलिस तपास करीत आहेत.

मैत्रिणीसोबत गप्पा मारणाऱ्या युवकाला मारहाण
मैत्रिणीसोबत गप्पा मारत असलेल्या तरुणाला तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास साई उद्यान, चिंचवड येथे घडली. नीलेश गोविंद बागडे (२१, रा. साने चौक, चिखली) असे जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अतिश गायकवाड आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीलेश उद्यानात त्यांच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होते. त्यावेळी पाठीमागून तिघे आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यांनतर आरोपींनी शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बनावट पाण्याच्या बाटल्यांची विक्री
बनावट लेबल लावून पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली. याप्रकरणी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च २०२३ मध्ये महेंद्रा ऑक्सिटॉप कंपनी, वाकी खुर्द, चाकण येथे घडली. कंपनीचे मालक महेंद्र गोरे (रा. वाकीखुर्द, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र गोरे यांची महिंद्रा इंटरप्रायजेस ही कंपनी महेंद्रा ऑक्सिटॉपचे लेबल लाऊन उत्पादित करीत असलेल्या पाण्याच्या बाटल्या विक्री करते. आरोपी यांच्या कंपनीने फिर्यादी यांच्या ऑक्सीरीज कंपनीच्या लेबल सारखे लेबल लावले. याबाबत आरोपींनी भारतीय ट्रेडमार्क विभागाची कोणतीही परवानगी न घेता लेबल पाण्याच्या बाटल्यांवर चिकटवून त्याची ग्राहकांना विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत फसवणूक आणि भारतीय ट्रेडमार्क अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण
वाहतूक नियमन करत असलेल्या वाहतूक पोलिसाला एका कार चालक महिलेने बेदम मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (ता. ८) सकाळी पद्मभूषण चौक, हिंजवडी येथे घडला. पोलिस हवालदार रोहिदास बोऱ्हाडे असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अमृता श्याम केसवड (वय ४०, रा.
खराबवाडी, चाकण) या महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिंजवडी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळी अकरा वाजता हिंजवडी येथील पद्मभूषण चौकात ते वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी चौकात नाकाबंदी लावली असताना आरोपी महिला कार घेऊन तेथे आली. सार्वजनिक रस्त्यावर महिलेने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच, फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

महिलेचा पाठलाग करून विनयभंग
रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आला. हा प्रकार शनिवारी (ता. ६) कुदळवाडी, चिखली येथे घडला. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिद्धाना बसवराज कमागडी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुदळवाडी येथून पायी चालत होत्या. त्यावेळी आरोपी कार घेऊन तेथे आला. फिर्यादीचा पाठलाग करून विनयभंग केला. तसेच, फिर्यादी यांना मारण्याची धमकी देऊन त्यांना मोबाईलवर संपर्क करत त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

व्यापाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा
व्यावसायिकाकडे प्रत्येक महिन्याला हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (ता. ७) रात्री साडेनऊच्या सुमारास रिव्हर रोड, पिंपरी येथे घडला. गणेश शिरसाठ (३०, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप अशोककुमार मोटवानी (३७, रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रिव्हर रोड, पिंपरी येथे दुकान आहे. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. हप्ता न दिल्यास धंदा करू देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या अन्य दोन दुकानांमध्ये जाऊन आरोपीने हप्ता देण्याची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महिलेच्या हातातील बांगडी पळवली
पीएमपी बसमध्ये चढताना महिलेच्या हातातील दोन तोळ्याची सोन्याची पाटली चोरून नेली. ही घटना भोसरी येथील पीएमटी बस थांब्यावर सोमवारी (ता. ८) दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला भोसरी पीएमपी बस थांब्यावरून आळंदीच्या बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढताना दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादींच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची पाटली चोरून नेली. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.