प्रतिकूलतेतही खंबीरपणे लढण्याचे प्रेरणास्थान खासदार तथा अभिनेते डॉ. कोल्हे यांची छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भावना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिकूलतेतही खंबीरपणे लढण्याचे प्रेरणास्थान

खासदार तथा अभिनेते डॉ. कोल्हे यांची छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भावना
प्रतिकूलतेतही खंबीरपणे लढण्याचे प्रेरणास्थान खासदार तथा अभिनेते डॉ. कोल्हे यांची छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भावना

प्रतिकूलतेतही खंबीरपणे लढण्याचे प्रेरणास्थान खासदार तथा अभिनेते डॉ. कोल्हे यांची छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भावना

sakal_logo
By

‘कॉफी विथ सकाळ’ : लोगो
--


लीड
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग हिंदुस्थान ॲंटिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या नेहरूनगर येथील मैदानावर गुरुवारपासून (ता. ११) मंगळवारपर्यंत (ता. १६) होत आहेत. त्यात खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. त्यानिमित्त त्यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमांतर्गत ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात येऊन संवाद साधला. त्यातून त्यांनी महानाट्याची संकल्पना, निर्मिती आणि उद्देश यांसह विविध पैलूंचा उलगडा केला. त्याचा सारांश....


महानाट्य होणार असलेल्या एचए मैदानात व रंगमंचावर डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. १०) चालणे, धावणे व घोडेस्वारीचा सराव केला. त्याबाबत ते म्हणाले, ‘‘घोड्याशिवाय छत्रपती साकारणे अशक्य आहे. म्हणून नाटकात घोडेस्वारी महत्त्वाची आहे. महानाट्याचा प्रयोग होण्यापूर्वी ते मैदान, तो रंगमंच नजरेत घ्यावा लागतो. सराव करावा लागतो. प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी घोडा नियंत्रणात ठेवणंही गरजेचं असतं. त्यासाठी नियमित सराव महत्त्वाचा ठरतो. अनेकदा प्रयोगादरम्यान काही अपघात होत असतात. माझाही झाला आहे. पण, माझी कायम एक श्रद्धा आहे की, ‘महाराज बघून घेतील’. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे असामान्य चैतन्य आहेत. तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे एखाद्या भूमिकेला साद घालाल, तेवढ्या उत्कंठेने रसिकांचा प्रतिसाद मिळतो. हेतू शुद्ध असेल तर, तुम्हाला यश मिळवून देतो.’’

शंभूराजांच्या चरित्रातून शिकवण
‘जगावे कसे’, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले. तर, ‘शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे कसे’, हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवले. प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे लढण्याची प्रेरणा प्रत्येकाने शंभू राजांकडून घ्यावी. स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने संभाजी महाराजांचे चित्र रेखाटले जाते. जगाच्या इतिहासात असा एकमेव राजा आहे, ज्याच्या बलिदानानंतर रयतेने तब्बल १८ वर्षे निकराने लढा दिला. काबूल ते बंगालपर्यंत साम्राज्य असलेल्या शहेनशहा औरंगजेबाची कबर त्यांनी खोदली. संभाजी महाराजांच्या इतिहासाचे सार शिवपुत्र संभाजी या महानाट्याद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

लेखन, दिग्दर्शन, कलाकार
महानाट्याची निर्मिती ही राजा शंभू छत्रपती प्रॉडक्शनची आहे. संहिता लेखन व दिग्दर्शन महेंद्र वसंतराव महाडीक यांचं आहे. जगदंब क्रिएशनची प्रस्तुती आहे. बादशहा औरंगजेबाची भूमिका राजन बने यांनी साकारली आहे. महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर आहेत. अनाजी दत्तोंच्या भूमिकेत महेश कोकाटे, दिलेरखान आणि मुकर्रबखान अशा दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडते आहे. कवी कलश यांची भूमिका अजय तपकीरे आणि सरसेनापती हंबीररावांची भूमिका रमेश रोकडे यांनी साकारली आहे. एकूण ७५ कलाकार आहेत. पडद्यामागील कलाकारांसह साडेचारशे लोक काम करत आहेत. प्रत्येक सेकंदाला महत्त्व देऊन भूमिका साकारावी लागते. २००६-०७ पासून आम्ही सर्वजण एकत्रित काम करतो. आमचं एक कौटुंबिक नातं निर्माण झालं आहे. तरीही प्रत्येक जण आपली भूमिका अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी प्रयत्न करतो. कारण, आमचा प्रेक्षक दररोज नवीन आहे. त्याच्या प्रत्येक पै-पैचं मनोरंजन त्याला मिळावं, हा प्रामाणिक हेतू असतो.

महानाट्याचा प्रवास
सन २०१२ मध्ये महानाट्याचे प्रयोग सुरू झाले होते. कोविडच्या अगोदरपर्यंत जवळपास दोनशे प्रयोग झाले होते. कोविडमध्ये करमणुकीच्या कक्षा विस्तारल्या. त्यामुळे महानाट्याच्या

सादरीकरणात बदल केले. प्रकाशयोजना, नेपथ्यात बदल केले. डिसेंबरमध्ये प्रयोग सुरू केले. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, निपाणी, कोल्हापूरला प्रयोग झाले. या वर्षीच्या सिझनची सांगता महाराजांच्या कर्मभूमीत व्हावी, महाराजांनी ज्या भूमीला आपलं मानलं. ज्या मातीत त्यांचा जन्म झाला. आपलं बलिदान दिलं. त्या मातीत या सिझनची सांगता व्हावी म्हणून पिंपरी-चिंचवडची निवड केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा प्रवास या तीन तासांच्या महानाट्यातून दाखवला आहे.

महानाट्याचे वेगळेपण...
शंभू राजांची प्रेक्षकांमधून चित्तथरारक घोडेस्वारी आहे. तडाखेबाज संवाद आहेत. १५० फुटी लांबीचा रंगमंच आहे व ८० फूट रुंद आहे. त्याची उंची ६५ फूट असून चार मजले आहेत. मराठे व मोगल रणसंग्राम-लढाईचा प्रसंग आहे. किल्ले जंजिरा मोहिमेसाठी २२ फूट लांबीचे जहाज दिसेल. थेट प्रेक्षकांमधून जाणारी गनिमिकाव्याची बुऱ्हाणपूर मोहीम आहे. संपूर्ण मैदानाचा वापर रंगमंच म्हणून केला आहे. अधिकाधिक पात्रांचे संवाद त्या-त्या कलाकारांच्याच आवाजात आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक मिरवणूक प्रेक्षकांमधून आहे. चारही मजल्यांचा अभिनयासाठी वापर केला आहे. हे नाटक बघण्यासाठी नसून अनुभवण्याचे नाटक आहे. २०० कलाकार रंगमंचावर असतात. साडेबारा टन भार पेलू शकणारा रंगमंच आहे. प्रेक्षकांसह सर्व कलाकारांच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे.

संहितेसाठी संदर्भ ग्रंथ
जयसिंगराव पवार, सेतू माधवराव पगडी, डॉ. कमल गोखले यांचा संशोधन प्रबंध अशा वेगवेगळ्या लेखकांच्या साहित्याचा आधार घेऊन एक सर्वसाधारण संहिता तयार केली आहे. महेंद्र वसंतराव महाडीक यांनी संहिता लेखन केले आहे.

घोड्यावरून प्रेक्षकांमधून प्रवेश
प्रत्येक प्रेक्षकाला संभाजी महाराजांचे रूप जवळून पाहता यावे, त्यांचे व्यक्तिमत्त्व जवळून न्याहाळता यावे, यासाठी प्रेक्षकातून प्रवेश करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. हा प्रवेश प्रेक्षकांना खूप भावल्याचं, यापूर्वीच्या प्रयोगातून दिसून आले आहे. संभाजी महाराजांची प्रतिमा प्रत्येकाच्या मनात ठसावी, यासाठीचा हा प्रयत्न आहे. शिव-शंभू भक्त म्हणून मनात एक भावना असते, की कुठेही उणीव राहता कामा नये. साडेनऊ हजार प्रेक्षकांपैकी एकालाही वाटू नये की प्रयोगाचा थकवा आला आहे किंवा एनर्जी कमी पडतेय, म्हणून प्रेक्षकांमधून प्रवेश केला आहे आणि नवीन प्रयोग करायचे असतात. प्रत्येकवेळी मागची पाटी पुसून नव्याने लिहायची सवय लावली तर स्वत:मध्ये सुधारणा करायला नेहमी वाव असतो, म्हणून हे करतो. कारण जेव्हा महानाट्याचा प्रयोग असतो, तेव्हा अडीच तास छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्या ताकदीने करावी लागते.

भूमिका हेचि भाग्य
सुमारे ३५० वर्षे मागे जाऊन शिवरायांचा इतिहास सांगण्याची संधी मिळते, हेच माझ्या दृष्टीने भाग्याचे आहे. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी. महाराजांचे विचार केवळ बोलण्यापुरते असता कामा नये, त्या विचारांचे अनुकरणही करता आले पाहिजे. संभाजी महाराज हे केवळ इतिहास नाहीत. तर ते एक लोककल्याणकारी राजे आहेत. त्यांच्या चरित्रातून इतिहासाची प्रेरणा लोकांपर्यंत पोहोचत आहे. छत्रपतींच्या लोककल्याणकारी राज्याची प्रेरणा अचूक पद्धतीने घेऊन चरित्र मांडलं पाहिजे. म्हणूनच एक कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न केला. छत्रपतींचे चरित्र समाजापर्यंत पोहोचण्याचे आपण माध्यम ठरलो. तरुणांसमोर छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र आदर्श आहे. पित्याच्या स्वप्नांचं भान ठेवून ते साकारण्यासाठी लढणारा मुलगा हे आदर्श आहे. डोळ्यांचे पारणे फिटेल, याची खात्री आम्ही या महानाट्याच्या निमित्ताने देतो. अभिनयाच्या माध्यमातून महाराजांचे चरित्र मांडतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारण्याचं भाग्य मला मिळालं आहे.
भविष्यात हिंदी प्रयोग
शिवपुत्र संभाजी महानाट्याचे पावसाळ्यात हिंदीमध्ये डबिंग होईल. त्यानंतर देशामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा प्रयोग करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक जिल्ह्यात व नंतर तालुकास्तरावरही प्रयोग करणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आपला इतिहास पोचला पाहिजे. कारण, तो पोहोचण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत, असे वाटते. ही कमी भरून काढण्याचा प्रयत्न करतो आहे.
---