भागीदारीच्या बहाण्याने 
चाळीस लाखांची फसवणूक

भागीदारीच्या बहाण्याने चाळीस लाखांची फसवणूक

पिंपरी : भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने एकाची ४० लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २७ सप्टेंबर २०२१ ते १८ जानेवारी २०२२ या कालावधी कोरेगाव पार्क येथे घडला. वसंत पांडुरंग साबळे (वय ६४, रा. दिघी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौतम शिवाजी मोरे (वय ३९, रा. कल्याण पश्चिम, ठाणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने त्याच्या आरोग्य भारती मेडिकल स्टोअर्सची फ्रेंचायसी देण्यासाठी फिर्यादीकडून १० लाख रुपये घेतले. आरोग्यवत मेडिकेअर प्राली या कंपनीत वीस टक्के भागीदारीसाठी तीस लाख रुपये घेतले. त्यानंतर व्यवसायाच्या खोट्या जाहिराती बनवून आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

जमीन खरेदीत सव्वासात लाखांची फसवणूक
पिंपरी : मध्यस्थीने जमिनीचे पैसे मूळ मालकाला न देता स्वतःकडे ठेऊन फसवणूक केली. हा प्रकार २२ जानेवारी २०१७ ते १६ जानेवारी २०२३ या कालावधीत मावळ तालुक्यातील शिरगाव येथे घडला. दशरथ सत्यप्पा बनसोडे यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमित अशोक ठोकळे (रा. शिरगाव, ता. मावळ), शैलेश रमेश देशमुख (रा. टेंभूरखेडा वरुड, जि. अमरावती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन खरेदी विक्री करण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी नेमलेल्या एजंटने जमिनीच्या मूळ मालकाला पैसे न देता फसवणूक केली. आरोपींनी प्लॉटचे ठरल्याप्रमाणे सात लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलिस तपास करीत आहेत.


पोटच्या मुलीसोबत गैरवर्तन; आईवर गुन्हा
पिंपरी : जन्मदात्या आईने साथीदाराच्या मदतीने स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार ऑक्टोबर २०२२ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत चाकण येथे घडला. पीडित मुलीच्या वडिलांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलीची आई व तिचा साथीदार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसोबत फिर्यादी यांच्या पत्नीने गैरवर्तन केले. फिर्यादी यांच्या पत्नीच्या साथीदाराने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या बाबत माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसात धावून घेऊन तक्रार नोंदवली. चाकण पोलिस तपास करीत आहेत.


मरकळमध्ये दारूभट्टीवर छापा
पिंपरी : मरकळ येथे ओढ्याजवळ सुरू असलेल्या दारूभट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. या कारवाई पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. मंगळवारी (ता. ९) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस शिपाई विकास पालवे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला मरकळ येथील ओढ्याच्या बाजूला गावठी हातभट्टी दारू तयार करीत होती. या बाबत पोलिसांना माहिती मिळाली असता त्यांनी छापा मारून कारवाई केली. त्यात दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.

तडीपार गुंडासह दोघांना अटक
पिंपरी : शस्त्र बाळगणाऱ्या तडीपार गुंडासह दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दळवीनगर, चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली. अविनाश ऊर्फ तोत्या शिवाजी पांढरकर (वय २४, रा. पांढरकरनगर, आकुर्डी), प्रफुल्ल राजेंद्र ढोकणे (वय २४, रा. डांगे चौक, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अंमलदार आशिष बोटके यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दळवीनगर येथील उड्डाणपुलाच्या खाली दोघेजण शस्त्र घेऊन आले. या बाबत खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक
सुरा आणि एक कोयता अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपी अविनाश पांढरकर याला ३१ मे २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहेत. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात विनापरवाना आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी : अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कुरुळी गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या ब्रिजवर ही घटना घडली. याप्रकरणी सहायक फौजदार मधुकर पानसरे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.
रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एकजण चाकण-पुणे रस्त्याने पायी चालत होता. दरम्यान, कुरुळी येथे इंद्रायणी नदीच्या पुलावर आल्यानंतर अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

उर्से टोलनाक्यात दोघांना अटक
पिंपरी : उर्से टोलनाक्यावरून चोरट्यांनी ८६ हजारांचे लोखंडी बार चोरून नेले. ही घटना सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शिवराज दशरथ सिंग (वय २०), योगेंद्र प्रल्हाद सिंग (वय २२, दोघे रा. बरखेडा, ता. गरोठ, जि. मंदसोर, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजेश रविकुमार तातीनैनी यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उर्से टोलनाक्यावर कामासाठी लागणारे ८६ हजार ३३२ रुपये किमतीचे ३४० लोखंडी गज आरोपींनी चोरून नेले. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली आहे.


किवळे येथे विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न
पिंपरी : घरगुती कारणावरून गळा दाबून विवाहितेचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेला घरात १५० उठाबशा काढायला लावल्या. हा प्रकार ९ मे रोजी आदर्शनगर, किवळे येथे उघडकीस आला. जावेद मुबारक मुल्ला, मुबारक मुल्ला, मोसिन मुबारक मुल्ला, दोन महिला (सर्व रा. आदर्शनगर, किवळे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादींचा डिसेंबर २०२१ मध्ये विवाह झाला. त्यानंतर सासरच्यांनी घरातील किरकोळ कारणावरून फिर्यादी यांच्याशी वाद घातला. फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी यांना जबरदस्तीने १५० उठाबशा काढायला लावल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com