करिअरबाबत मुलांवर सक्ती नको

मार्गदर्शकांचा सल्ला; आवडीच्या क्षेत्रात घेऊ द्या भरारी

करिअरबाबत मुलांवर सक्ती नको मार्गदर्शकांचा सल्ला; आवडीच्या क्षेत्रात घेऊ द्या भरारी

पिंपरी, ता. १० ः ‘सर, माझ्या घरात सर्वच आयटीयन्स आहेत. ते मलाही म्हणतात की, ‘तूही आयटीतच जा.’ पण, मला ते आवडत नाही. मला आर्टस् किंवा कॉमर्सला जायचंय, काय करू?’ असे करिअर मार्गदर्शकांना सांगत दहावीची परीक्षा दिलेला विद्यार्थी रडकुंडीला आला होता. तर, ‘मला सायन्समध्ये ग्रॅज्युएट करायचे होते. पण, मामा व मामींच्या आग्रहामुळे फार्मसी करावं लागतंय. मला त्यात रस नाही,’ असं हतबल झालेला योगेश सांगत होता. त्यावर समुपदेशक व करिअर मार्गदर्शकांचे सांगणे होते, की ‘आपल्याला आवडतं, त्या क्षेत्रात करिअर करा. मुलांच्या मनाविरुद्ध करण्याची सक्ती केल्यास त्यांना नैराश्य येऊ शकतं.’
सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्या आहेत. सर्वच विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर काय करायचे? कोणती विद्याशाखा निवडायची? कशात करिअर करायचे? पालकांची वा अन्य जवळच्या नातेवाइकांची इच्छा काय आहे? विशेषतः बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला जायचे की मेडिकलला जायचे?, फार्मसी करायचे की नियमित पदवी घ्यायची? असे अनेक प्रश्न बहुतांश मुलांसमोर आहेत. काहींनी निश्चित ध्येय ठरविले आहे. काही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आहेत. काही शाळांनी दहावीचे तर कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. अशा विद्यार्थी व पालकांमध्येही करिअर कशात करायचे? याची चर्चा सुरू असल्याचे दिसते. बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी सीईटी, जेईई, नीटची तयारी करत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

ती मुलगी नैराश्यात गेली
त्या मुलीला चित्रकलेची आवड होती. पण, पालकांच्या इच्छेनुसार इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तिचं मन त्यात रमत नव्हतं. इंजिनिअरिंगमधलं तिला काही कळत नव्हतं. त्यामुळे ती नैराश्यात गेली. कोणाशी बोलत नव्हती. जेवण करत नव्हती. सारखी रडत होती. कॉलेजला जात नव्हती. पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तिचे समुपदेशन करावे लागले. आता ती पूर्वीसारखी वागते आहे.

करिअरची निवड करताना विद्यार्थ्यांनी शिक्षक वा पालकांचा सल्ला किंवा मार्गदर्शन जरूर घ्यावे. पण, आपल्याला कोणत्या विषयात आवड आहे, याचाही विचार करावा. पालकांनीही मुलांना मार्गदर्शन करावे. मात्र, सक्ती करायला नको.
- प्रा. आशिष दुबे, चिंचवड

मुलांनी चांगलं शिकावं, उच्च शिक्षित व्हावं, असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. त्यात काही चुकीचं नाही. पण, मुलांच्या मनाविरुद्ध त्यांना करायला लावलं तर ते नैराश्येत जाऊ शकतात. आवडीच्या क्षेत्रात ते चांगलं करिअर करू शकतात.
- डॉ. योगेश पोकळे, समुदेशक व मानसोपचार तज्ज्ञ, भोसरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com