
महापालिका रुग्णालयांस राज्य मानांक प्रमाणपत्र
पिंपरी, ता. ११ ः केंद्र शासनाद्वारे प्रसुतीगृह गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम ‘लक्ष्य’ राबविण्यात येतो. त्याअंतर्गत नवीन थेरगाव रुग्णालय, चिंचवड येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (तालेरा) रुग्णालय व पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालयांचे राज्यस्तरीय निरीक्षक पथकाने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात निरीक्षण केले होते. या तीनही रुग्णालयांना राज्य सरकारच्या मानांकानुसार राज्यस्तरिय प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्या आधारे रुग्णालयांना केंद्र सरकार स्तरावरील राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक गुणवत्ता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महापालिका वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी दिली. यामुळे रुग्णालयांमधील प्रसुतिगृह व शस्त्रक्रिया कक्षांचा गुणात्मक दर्जा वाढविण्याचा मानस आहे. जेणेकरून गरोदर महिला, प्रसुत माता व नवजात शिशु यांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारता येईल, असेही त्यांनी सांगितले.