गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

क्रिकेट बेटिंगप्रकरणी
पिंपरीतील दोघांवर गुन्हा
पिंपरी : क्रिकेट मॅचवर बेटिंग लावणाऱ्या दोघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट दोन यांनी नऊ मे रोजी रात्री पिंपरीतील प्रीत अपार्टमेंटमध्ये ही कारवाई केली. या प्रकरणी सनी प्रेमचंद गुरुनानी (वय ३३) व सचिन सुदाम हासनदासानी (दोघे रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस नाईक शिवाजी मुंढे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी चालू क्रिकेट मॅचचा भाव पाहून बेटिंग लावली. या बाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्यांच्यावर कारवाई केली. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस उपनिरीक्षक माने करीत आहेत.

तळवडेत महावितरण कार्यालयात तोडफोड
वीज खंडित झाल्याच्या रागातून पाच ते सात जणांनी मिळून तळवडे येथील महावितरण कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करीत गोंधळ घातला. या प्रकरणी राहुल एकनाथ इंगळे यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव जिरे, दत्ता राऊत, विभिवान पोकळे (रा. रुपीनगर) महिला आरोपी, नारायण जिरे व इतर दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले. रुपीनगर येथील अंडरग्राऊंड केबल जळाली होती. त्यामुळे परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. फिर्यादी दुरुस्तीचे काम असताना आरोपी तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करीत कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

महिलेची २८ लाखांची ऑनलाइन फसवणूक
व्हॉटसॲपवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगून महिलेला २८ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार १३ फेब्रुवारी ते १४ एप्रिल या कालावधीत मुळशी येथे घडला आहे. याप्रकरणी महिलेने बुधवारी (ता.१०) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींना आरोपीने व्हाट्‌सॲपद्वारे लिंक पाठवली. त्यावर फिर्यादी यांनी क्‍लिक करताच त्यांना ‘टेलिग्राम’वर अकाऊंट तयार करण्यास सांगितले. त्यानंतर वेळोवेळी ‘क्रिप्टो करन्सी प्लॅटफॉर्म’वर फिर्यादी यांना २८ लाख ८५ हजार पाठवण्यास सांगून फसवणूक केली.

सव्वा लाखांचे दागिने चोरीस
टेरेसचे सेफ्टी डोअर तोडून चोरट्याने घरातील सव्वा लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना ८ मे रोजी पिंपरीतील उद्यमनगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी मोसीन अफसर शेख (१९, रा.उद्यमनगर) यांनी बुधवारी (ता. १०) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी घरी नसताना घराच्या टेरेसच्या सेफ्टी दरवाजा तोडून चोराने घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममध्ये जात कपाटाताली फिर्यादीच्या पत्नीचे ४५ ग्रॅम वजनाचे एक लाख २८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. फिर्यादी घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला.

पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडले
तरुणाच्या डोक्‍याला पिस्तूल लावून सातशे रुपयांचा मोबाईल आणि ४० रुपये लुटले. हा प्रकार कुरळीत घडला. या प्रकरणी जयराम भौरा मुंडा (२८, रा. कुरुळी) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदेश मदन कड (२३, रा. कडाचीवाडी, खेड) विशाल प्रकाश वाणी (२३, रा. कडाचीवाडी) यांना अटक केली आहे. अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रस्त्याने पायी जात असताना आरोपी दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे तंबाखू मागितली. फिर्यादी तंबाखू देत असताना आरोपींनी फिर्यादीचे हात पकडून खिशातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. फिर्यादींनी प्रतिकार केला असता आरोपींनी थेट पिस्तूल फिर्यादीच्या डोक्‍याला लावून ओरडणे बंद कर नाही तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या खिशातून मोबाईल व ४० रुपये काढून घेतले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तपास म्हाळुंगे पोलिस करीत आहेत.