
लग्नसराई भाग मालिका - महागडे कपडे, ज्वेलरी भाडेतत्वावर घेण्यास पसंती विविधतेची भुरळ ः कपड्यांचे दोन हजारांपासून दहा हजारापर्यंत दिवसाचे भाडे
आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १३ ः पार्टी असो की हल्ली तीनचार दिवस चालणारे लग्नसमारंभ सोहळे, यामध्ये वापरले जाणारे महागडे कपडे एक- दोनदा वापरल्यानंतर ते क्वचितच पुन्हा वापरण्याचा योग येतो. त्यानंतर हे कपडे कपाटाच्या एका कोपऱ्यात पडून असतात. अशाच महागड्या कपड्यांपासून ते कृत्रिम आकर्षक ज्वेलरीपर्यंतचे साहित्य अल्प दरात भाड्याने उपलब्ध करून दिल्याने शहरात नवा ट्रेंड सुरू झाला आहे.
लग्नात घोड्यांच्या टापा
लग्नाची वरात घोड्यावरच पाहिजे, अशी इच्छा असलेल्या परिवारातील लग्नकार्यासाठी घोड्यांचे बुकिंग सध्या तेजीत आहे. बग्गी आणि रथाचीही मागणी यंदा वाढली आहे. शहरात शंभर जणांकडे घोडे आहेत. पंधराशेपासून तीन हजार रुपयांपर्यंत घोड्यांचे बुकिंग सुरू आहे. नवरदेवासाठी घोड्यांबरोबरच बग्गींनाही चांगली मागणी असून, त्यांचेही बुकिंग होत असल्याचे घोडेवाले सयाजी चोरखे यांनी सांगितले.
बँड पथकांची बुकिंग जोरात
पारंपरिक बॅंडबरोबर सध्या ४०७ रिव्हर्स गाडीला प्राधान्य दिले जात आहे. जुन्या जमान्यातील गाणी वरातीत वाजविली जातात. त्यातून गाणे म्हणणाऱ्या गायकांना रोजगार मिळत आहे. शहरातील बँडपथकांमध्ये दहा ते पंधरा जणांचा समावेश असतो. सुमारे सात हजारांपासून वीस हजार रुपयांपासून पैसे ही पथके घेतात. यात हळद, मेहंदी, बिदाई, गोंधळ आणि लग्नाच्या अन्य विधीसाठी बँड लागणार असेल तर त्याचे वेगळे पैसे घेत असल्याचे गणेश गोरखे यांनी सांगितले.
कोणत्या कपड्यांना मागणी
साखरपुडा, संगीत, मेंदी, लग्न आणि लग्नसमारंभासाठी दहा ते २५ हजार रुपयांचे कपडे विकत घेण्यापेक्षा दोन हजाराचे भाड्याने घेण्यामागची मानसिकता तयार झाली आहे. लग्न समारंभ, प्री-वेडिंग शूट, संगीतासाठी साजेसे कपडे उपलब्ध होतात. यामध्ये शेरवानी, नवाबी, ब्लेझर, जोधपुरी, पठाणी, लेहंगा, डिझायनर साडी, इंडो वेस्टर्न सूट, टक्सीडो, नऊवारी साडी, कच्छीकाम, मिरर वर्क, गोंडा वर्क, इंडोवस्टर्न घागरा, डबल लेअर घागरा या कपड्यांना मागणी असते. या कपड्यांचा दर एका दिवसासाठी दोन हजार रुपयांपासून आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत आहे.
बंगाली आणि राजस्थानी मंडप
सध्या जुन्या पद्धतीचे लग्न मंडप हद्दपार झाले आहेत. मंडपात डेकोरेशन मंडप, बंगाली पद्धतीचा मंडप, राजस्थानी मंडप अशा मंडपाचे आकर्षण वाढत आहे. स्वागत समारंभासाठी बंगाली आणि राजस्थानी पद्धतीच्या मंडपाला जास्त मागणी आहे. घराच्या एका भिंतीवर एका रंगाचा तर दुसऱ्या भिंतीवर दुसऱ्या रंगाचा पडदा असतो. त्याप्रमाणे मंडपास वेगवेगळ्या बाजूने वेगळा आणि आकर्षक रंगाच्या पडद्याला जास्त मागणी आहे.
मैफल संगीताची
चित्रपट- मालिकांप्रमाणेच आता खऱ्याखुऱ्या लग्नातही विविध कार्यक्रम केले जात आहेत. त्यात लक्षवेधी असतो तो संगीत सोहळा. संगीत म्हणजेच धमाल, मस्ती, नाचणे. आता विविध पद्धतीने हा संगीत सोहळा रंगतोय. संगीताचा कार्यक्रम आजच्या लग्नात आवश्यक झाले आहे.
मेंदी
भारतीय संस्कृतीत हातांना मेंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. लग्नात नवरीच्या हातावर मेंदी काढणे हा तर खास सोहळाच बनला आहे. नववधूचे पूर्ण हात आणि पाय भरून मेंदी काढली जाते. हल्ली अगदी चित्रपटांसारखेच मेंदी कार्यक्रम घेतले जातात. नववधू सोबतच पूर्ण नातेवाईक, मैत्रिणी त्या कार्यक्रमात मेंदी काढताना डान्स, मस्ती, धमाल करतात.
वधू-वरांची पादत्राणे
लग्नात वेगवेगळ्या कपड्यांसोबतच नववधूंचा स्टायलीश पादत्राणे घेण्याकडे कल असतो. सध्या लग्नात चप्पल, सॅंडल, जुती, कोल्हापुरी चप्पल असे चार-पाच जोड खरेदी केले जातात. मणी, स्टोन, डायमंड, जरदोसी वापरून नाजूक नक्षिकाम केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चपला खरेदीवर भर आहे. पूर्वी मरून, गोल्डन, सिल्व्हर या रंगांत उपलब्ध होणाऱ्या चपलांत आता पिवळा, हिरवा, निळा, लाल असे रंग आले आहे. साधारण हजार रुपयांपासून आपल्या आवडीनुसार डिझायनर चपलांची किंमत असून उपलब्ध आहेत.
विद्युत रोषणाई
पूर्वी घरासमोर, मंगल कार्यालयाबाहेर प्रकाशझोतासाठी मोठे हॅलोजन लावत. आता त्या पद्धतीत बदल होऊन विविध रंगाच्या माळा त्याचबरोबर सध्या एलईडी लाइटला जास्त मागणी आहे. फिक्सल कलर लाइट, मल्टिकलर याचे हॅलोजन आणि एलईडी लाइट वापरून विद्युत रोषणाई करण्यात येते. ग्राहकांच्या मागणीनुसार रोषणाई केली जाते. डेकोरेशनसाठी १० हजारांपासून लाखापर्यंत खर्च येत आहे.
(समाप्त)