
पर्यावरण जागृती वक्तृत्व स्पर्धेत साताऱ्याचे अभिजित जाधव प्रथम
पिंपरी, ता. १५ ः स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण जागृती वक्तृत्व स्पर्धेत अभिजित जाधव (सातारा) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मयूरी गायकवाड (पुणे) आणि समृद्धी रानडे (रत्नागिरी) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविले.
प्राधिकरणातील कॅप्टन कदम सभागृहात पारितोषिक वितरण झाले. यावेळी मेजर विनीत कुमार, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, सचिव सागर पाटील, ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी विजय सातपुते उपस्थित होते. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम दहा हजार, पाच हजार आणि तीन हजार व स्मृतिचिन्ह देऊन गौरविले. ‘जंगले’, ‘जलसंवर्धन’ आणि ‘प्लास्टिकचा भस्मासुर’ या तीन विषयांवर ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून स्पर्धा झाली. अंतिम फेरीसाठी अकरा स्पर्धकांतून प्रत्यक्ष सादरीकरणासाठी निवड केली होती. मेजर विनीत कुमार म्हणाले, ‘‘पुणे परिसरातील हिरवाई मनाला सुखकर वाटते. तर पर्यावरणाविषयी जागृत असलेली संस्था अन् तरुणाई मनाला दिलासा देते आहे.’’ डॉ. विश्वास येवले, डॉ. रवींद्र जायभाय, प्रा. शैलजा सांगळे यांनी परीक्षण केले. डॉ. सुजाता बाउस्कर आणि सुनील गुरव यांनी परिचय करून दिला. दीविनीत दाते यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत मापारी यांनी आभार मानले.