पालखी मार्गावर देशीवृक्ष लावा; स्वच्छतागृह वाढवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी मार्गावर देशीवृक्ष लावा; स्वच्छतागृह वाढवा
पालखी मार्गावर देशीवृक्ष लावा; स्वच्छतागृह वाढवा

पालखी मार्गावर देशीवृक्ष लावा; स्वच्छतागृह वाढवा

sakal_logo
By

पालखी मार्गावर देशीवृक्ष लावा; स्वच्छतागृह वाढवा

पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्तांची मागणी; महापालिकेत आढावा बैठक

पिंपरी, ता. १७ ः ‘पालखी मार्गावर देशी वृक्षांची लागवड करावी,’ ‘सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी’, ‘मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा’, ‘कार्डियाक ॲम्बुलन्सची सोय करावी’, ‘पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,’ अशा मागण्या पालखी सोहळ्याबाबत वारकऱ्यांनी केल्या. निमित्त होते, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे आयोजित आढावा बैठकीचे.
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा १० जून रोजी देहू येथून आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ११ जून रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. हे पालखी सोहळे अनुक्रमे मुंबई-पुणे महामार्ग आणि आळंदी-पुणे मार्गाने शहरातून मार्गस्थ होणार आहेत. संत तुकाराम महाराज यांचा सोहळा ११ जून रोजी आकुर्डीत मुक्कामी असेल. १२ जूनला आकुर्डी, चिंचवड स्टेशन, पिंपरी चौक, नाशिक फाटा, कासारवाडी, दापोडीमार्गे पुण्याकडे मार्गस्थ होईल. त्याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा चऱ्होली फाटा, चोविसावाडी, वडुमखवाडी, दिघी मार्गे पुण्याकडे मार्गस्थ होईल. या दोन्ही सोहळ्यांमुळे साधारण चार दिवस वारकऱ्यांचा मुक्काम शहरात असतो. त्याअनुषंगाने बुधवारी (ता. १७) महापालिकेत आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, पोलिस उपआयुक्त विवेक पाटील, उपआयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत दिसले, अन्न व औषध प्रशासन सहाय०क आयुक्त प्रशांत लायगुडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन पवन नव्हाडे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, उत्तम माने, जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त माणिकमहाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख अनिलमहाराज मोरे, भानुदासमहाराज मोरे, संजयमहाराज मोरे, विठ्ठल-मंदिर आकुर्डीचे विश्वस्त गोपाळ कुटे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी उपस्थित होते.

कृती आराखडा सादरीकरण
महापालिकेने तयार केलेल्या कृती आराखड्याचे सादरीकरण यावेळी झाले. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबाबत नियोजन केले आहे. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुढील आढावा बैठक घेण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या. तर, पालखीदरम्यान योग्य दक्षता व व्यवस्था करण्यात येईल, असे महावितरण आणि अन्न व औषध प्रशासन प्रतिनिधींनी सांगितले.

वारकरी आणि विश्वस्तांच्या सूचना
- वारकरी दिंडीप्रमुखांच्या सोयीसाठी महापालिका व वारकरी प्रतिनिधींचा संयुक्त स्वागत कक्ष उभारावा
- पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय करावी
- रस्त्यांतील अतिक्रमणे दूर करावीत
- पोलिस बंदोबस्त वाढावी
- पालखी मार्गावर देशी वृक्षांची लागवड करावी
- सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी
- मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
- कार्डियाक ॲम्बुलन्सची सोय करावी
- स्वागत कमानीवरील रंगरंगोटी व दिव्यांची दुरुस्ती करावी
- स्नानासाठी पाण्याचे नियोजन करावे
- पालखी पहाटे मार्गस्थ होत असल्याने पथदिवे सकाळी साडेसातपर्यंत चालू ठेवावेत
- पुरेसा टँकर पुरवठा करावा

यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यादृष्टिने तातडीने कामकाज करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.
- जितेंद्र वाघ, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

विविध पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांची बैठक घेतली आहे. त्यांच्याकडून पालखी मार्गाबाबत आढावा घेतला आहे. पालखी दरम्यान योग्य बंदोबस्त व उपाययोजना केल्या जातील.
- विवेक पाटील, पोलिस उपआयुक्त, पिंपरी-चिंचवड

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाच्या अनुषंगाने वाहतुकीत बदल करण्याबाबत सूचना देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही.
- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
---