
गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त
--------
किरकोळ कारणावरून काठीने मारहाण
पिंपरी : किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून एकाला लाकडी काठीने मारहाण केली. हा प्रकार ६ मे रोजी सांगवी फाटा येथील निखिल कन्स्ट्रक्शन येथे घडला.
धीरज तुकाराम सानप (वय- ३३, रा. रावेत) यांनी मंगळवारी (ता. १६) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिल पवार व आनंद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निखिल कन्स्ट्रक्शन या बांधकाम साइटवर काम करतात. ते साईटवरील ऑफिसमध्ये बसले असताना आरोपीने त्यांना फोन करून ‘तू माझ्या जवळच्या माणसाला काम का सांगितले’ , असे म्हणत हुज्जत घातली. त्यानंतर साइटवर येऊन फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच, लाकडी काठीने मारहाण करीत त्यांच्याकडील पाच हजार रुपये हिसकावून घेतले. यावरून सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलिस तपास करत आहेत.
चोरीप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा
पिंपरी : कंपनीत पोहचवण्यासाठी दिलेले ८४ हजार रुपयांचे साहित्य चोरल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० ते १५ मे या कालावधीत चिंबळी फाटा येथे घडली आहे.
याप्रकरणी शांताराम गोविंद जाधव (वय- ३७, रा. वाळूंज) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पो चालक सचिन उत्तम राठोड (२५, रा. जालना) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा टेम्पो चालक आहे. त्याच्याकडे चिंचवड येथील थरमॅक्स कंपनीत पोचविण्यासाठी १० टन ११० किलो वजनाचे १० लाख ५३ हजार १५० रुपयांचे प्लास्टीकचे साहित्य पोहोचविण्यासाठी दिले होते. मात्र, आरोपीने ८६० किलो वजनाचा ८४ हजार ७५५ रुपयांचे साहित्य परस्पर चोरून नेले. चाकण पोलिस तपास करीत आहेत.
महिलेची फसवणूक
पिंपरी : अंगावरचे दागिने आणि रोख रक्कमेच्या बदल्यात १५ तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट देतो, असे आमिष दाखवून वृद्धेचे दागिने पळवून नेले. ही घटना सोमवारी (ता.१५) दुपारी भोसरी येथील मच्छी मार्केटजवळ घडली.
याप्रकरणी महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला चाकणकडे जाण्यासाठी बसची वाट पाहत होत्या. त्यावेळी आरोपी फिर्यादी यांच्याजवळ आले. फिर्यादी यांच्याशी गप्पा मारत आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. ‘तुम्ही आम्हाला तुमच्या जवळचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम द्या, त्या बदल्यात १५ तोळे वजनाचे सोन्याचे बिस्कीट घ्या’ , असे आमिष आरोपींनी महिलेला दाखवले. त्यानुसार, फिर्यादी यांनी त्यांच्याकडील ७० हजार ३०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम फिर्यादी यांना दिली. आरोपींनी देखील फिर्यादी यांना पिवळ्या रंगाचे बिस्कीट दिले. मात्र, काही वेळाने फिर्यादी यांना ते सोन्याचे बिस्कीट बनावट असल्याचे लक्षात आले. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.