
शहरात स्मार्ट पार्किंग लवकरच
पिंपरी, ता. १८ ः शहरातील १० पैकी आठ ठिकाणी स्मार्ट पार्किंगचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल. तसेच, स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सेव्हरेज, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पांची कामेही प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
केंद्र सरकारच्या सुचनेनुसार स्थापन केलेल्या शहर सल्लागार समितीची बैठक गुरुवारी (ता. १८) झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या विकास कामांच्या अनुषंगाने त्यात चर्चा झाली. त्यानंतर सिंह यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. खासदार श्रीरंग बारणे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सचिव चित्रा पंवार, निमंत्रित सदस्य गोविंद पानसरे, अमित तलाठी, सिटीझन फोरम अध्यक्ष तुषार शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी दीपक पवार, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. आमदार अण्णा बनसोडे व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ऑनलाइन होते. स्मार्ट सिटीची कामगीरी, मिळालेले पुरस्कार, प्रकल्पांची प्रगती याबाबत इ. ॲंड वाय. आणि केपीएमजी या सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधींनी पीपीटीव्दारे सादरीकरण केले.
बारणे म्हणाले, ‘‘महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुविधा देणे आणि स्वच्छता, शौचालये, विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दिल्ली, मुंबईप्रमाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचवायला हवा. या शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी.’’
१२३ शाळांमध्ये ई-क्लास रुम
म्युनिसिपल ई-क्लास रुम प्रकल्प महामालिकेच्या १२३ शाळांमध्ये राबविला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषांचे धडे दिले जात आहेत. वर्गांमध्ये स्मार्ट टीव्ही व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. आरटीफीशल इंटेलिजेंटचा उपयोग करून विद्यार्थी व शिक्षकांवर नजर ठेवली जाणार आहे. शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इज्युकेशन सारथी सुरू करण्याचे नियोजन आहे. शाळांमध्ये १०० टक्के वॉटर फीटर बसविण्यात येणार आहेत. सिटी नेटवर्कचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे, असेही सिंह यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत सिंह म्हणाले...
- स्मार्ट सिटीमध्ये शहर सध्या २० व्या क्रमांकावर आहे
- २५ पैकी १६ प्रकल्प पूर्ण असून नऊ प्रकल्पांचे ८० टक्के
- इ-सर्व्हेलन्स प्रकल्पामुळे रस्त्यांवरील वाहनांवर नजर
- जीआयएस प्रणालीद्वारे उंच इमारती, रस्त्यांचे मोजमाप, बांधकामांची माहिती संकलित करून त्यावर नियंत्रण ठेवणार
----