Pimpri Chinchwad : महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यात एकवाक्यता Pimpri Chinchwad municipal election mahavikas aghadi leaders compromise politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri Chinchwad municipal election
महाविकास आघाडीत महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत एक वाक्यता

Pimpri Chinchwad : महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यात एकवाक्यता

पिंपरी - प्रभागांची रचना, इतर मागासवर्गीयांचे आरक्षण आदी प्रश्‍नांवरुन मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्यांमुळे सुमारे सव्वा वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लांबणीवर पडत आहे. मात्र; आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेस या शहरातील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये एकवाक्यता आहे.

निवडणुका न झाल्यामुळे १४ मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरु आहे. न्यायालयातील प्रलंबित दाव्यांमुळे निवडणूक वारंवार पुढे ढकलली जात आहे. नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी सुरवातीला निवडणुका लागतील म्हणून ५-६ महिने व नंतरही काही महिने तयारीसाठी खर्च केला. परंतु; आता निवडणुका वारंवार लांबणीवर पडत असल्याने इच्छुकांचाही हिरमोड झाला आहे. तर; वाढत्या खर्चामुळे अनेक इच्छुकांनी जनसंपर्क कार्यालयात थांबणेच बंद केल्याचेही बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी महापालिका निवडणुका उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये होतील, असे सूतोवाच पुणे येथे केले होते.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला एकहाती बहुमत मिळाल्याने महाविकास आघाडीच्या राज्य पातळीवरील व स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्येही उत्साह असून त्यांचे मनोबल वाढल्याचे दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांचे नेतृत्व असेपर्यंत सत्तेत समान वाटा व त्यानंतर काही वर्षे बऱ्यापैकी कॉंग्रेसचे नगरसेवक महापालिकेत होते. परंतु; कालांतराने शहरात कॉंग्रेसला उतरती कळा लागली होती.

पक्षाच्या प्राबल्यानुसार जागा वाटप?

मागील पाच वर्षात पुलाखालून खूपच पाणी वाहून गेले आहे. भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले आहेत. तर काही राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेले आहेत. शिवसेनेतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर शिंदे यांच्या गटात काही नगरसेवक गेले आहेत. तर; उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात काही नगरसेवक आहेत. आता महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास आघाडीतील पक्षाचे पूर्वीचे नगरसेवक व ज्या ठिकाणी नगरसेवक नाहीत, तेथे दुसऱ्या क्रमांकावर असलेला पक्ष म्हणजेच पक्षाचे प्राबल्य पाहून जागांचे वाटप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

महापालिकेतील २०१७ चे पक्षीय बलाबल -

भाजप - ७७

राष्ट्रवादी कॉंग्रेस - ३६

शिवसेना - ९

अपक्ष - ५

मनसे - १

एकूण - १२८

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भूमिकाच आहे की, महाविकास आघाडीने वज्रमुठ करून आगामी निवडणुका लढवाव्यात. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष आगामी काळात एकत्रच निवडणुका लढवू. कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या एकहाती विजयानंतर सहाजिकच राज्यात व शहरात महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे.

- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

राज्यपातळीवरील व स्थानिक निवडणुका लढविण्याचे निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र घेतील. कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या विजयानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची एकजूट राहील व याबाबत पक्षातील नेतेमंडळीही सहमत आहेत. आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढून, भाजपला पिंपरी चिंचवड शहरातून हद्दपार करणार आहे.

- सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी वज्रमुठ करून आगामी निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसच्या कर्नाटकमधील विजयामुळे महाविकास आघाडीत निश्‍चितच उत्साही वातावरण आहे. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांबाबतही वरिष्ठ पातळीवरुन आमचे नेते निर्णय घेतील व एकजुटीने आम्ही निवडणुका लढवू.

- कैलास कदम, शहराध्यक्ष, कॉंग्रेस.