पंचनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचनामा
पंचनामा

पंचनामा

sakal_logo
By

मोहमाया

‘‘पैसा, संपत्ती, जमीनजुमला ही मोहमाया आहे. मोक्ष मिळवायचा असेल तर त्यात अडकू नका. वेळीच सावध राहा.’’ गुंडेराव महाराजांनी आम्हाला सल्ला दिला आणि आम्हाला तो लगेच पटला. आम्ही लगेचच दोन हजारांच्या नोटांचे बंडल महाराजांच्या पुढ्यात ठेवले.
‘‘दोन हजारांच्या नोटा बंद होणार आहेत म्हणून खपवतोस काय?’’ महाराजांनी रागाने विचारले.
‘‘महाराज, दोन हजारांच्या नोटांनी कपाट भरलंय. एवढे पैसे घेऊन, बॅंकेत गेलो तर अडचण होईल. त्यामुळे होईल तेवढा दानधर्म करतोय. मागच्यावेळी तुम्हीच दानधर्माचे महत्त्व पटवून दिले होते.’’ आम्ही म्हटले.
‘‘आपल्या आश्रमासाठी आठवड्यातून एकदा दानधर्म करत जा. पैशांच्या मोहात अडकू नकोस.’’ महाराजांनी पुन्हा सल्ला दिला.
‘‘महाराज, पैसा हा मोह आहे, त्यात अडकू नका’ हा सल्ला देऊनही महिन्याला तुम्ही पंचवीस- तीस लाख कमवत असाल. खरंच तुम्ही ग्रेट आहात.’’ आम्ही नम्रतेने म्हटले व महाराजांना नमस्कार करून, आम्ही बाहेर पडलो.
खरं तर आम्हाला आता पैशांचा उबग आला आहे. गेली तीस वर्षे सरकारी अधिकारी असल्यामुळे पैशांमध्ये अक्षरशः लोळतोय. त्यामुळे आता कोठेतरी हे थांबवावं, असं वाटतंय.
पण अजून दोन वर्षे कसंतरी रेटायचं, असं ठरवलंय. दोन वर्षांनी रिटायर झाल्यानंतर कोणाकडून एक रुपयाही घ्यायचा नाही, असा निर्धार केलाय. एवढा पैसा कमवून, त्याचं काय लोणचं घालायचं का? पुण्यात पाच फ्लॅट, गावाकडे दोन फार्महाऊस, पंचवीस एकर जमीन एवढं सगळं आम्ही स्वकर्तृत्वावर मिळवलंय. आता लोणावळ्याला एक फार्महाऊस आणि पुण्यात एक बंगला बांधला, की सगळ्या मोहपाशातून सुटायचं आणि गुंडेराव महाराजांच्या आश्रमात जाऊन, मोक्ष मिळवायचा, असं आम्ही ठरवलंय.
पैशांच्या मोहात अडकू नका, या गुंडेराव महाराजांचा सल्ला आम्ही पूर्वीपासून अवलंबला आहे. त्याचबरोबर गरिबांच्या मदतीलाही आम्ही धावून जातो. पनवेल, अलिबाग, नवी मुंबई येथील डान्सबारमधील महिलांचे दुःख आम्हाला पाहवत नाही. ही मंडळी दुःखात असताना, आपण पैसे साठवून ठेवणे, हे आम्हाला पटत नाही. त्यामुळे डान्सबारमध्ये गेल्यावर आम्ही अक्षरशः या गरीब महिलांच्या अंगावर पैसे उधळून, पैशांचा आम्हाला मोह नाही, हे सिद्ध करतो.
हल्ली आम्ही साधी राहणीमान स्वीकारली आहे. ऐश-आरामात जगण्याचा आम्हाला उबग आला आहे. हल्ली आम्ही साध्या मर्सिडीजमधून प्रवास करतो. बाहेरगावी गेलो तर नाइलाजाने छोट्याशा फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहतो. तिथंही बेडवर न झोपता जमिनीवर झोपून, जमिनीशी असलेलं नातं टिकवतो. जेवणही घरून मागवतो. आमच्या घरचा नोकर विमान किंवा हेलिकॉप्टरने येऊन, घरचं गरमागरम जेवण आम्हाला देत असतो.
अमिताभ बच्चनच्या सहीपेक्षा जास्त भाव आमच्या सहीला आहे. आम्ही एखाद्या फाईलवर सही केल्यावर पाच- दहा लाख रुपये कोठे गेले नाहीत पण आम्ही अमिताभपेक्षा ग्रेट आहोत, असा टेंभा कधी मिरवत नाही. दोन वर्षानंतर हे सगळंच आम्ही स्वखुशीने थांबवणार आहोत. ‘पैसा, प्रॉपर्टी या मोहापासून दूर राहा. साधं जीवन जगा’. असा सल्ला गुंडेराव महाराजांच्या आश्रमात येणाऱ्या भाविकांना आम्ही देणार आहोत.
(एका सरकारी अधिकाऱ्याच्या डायरीतील चुरगाळलेली काही पाने)