गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त
---------

पिंपळे सौदागरमधील महिलेची
भेटवस्तूच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी : इंग्लंडवरून भेटवस्तू पाठविल्याचे सांगून एकाने महिलेला आठ लाखांचा गंडा घातला. ही घटना ९ मे दरम्यान पिंपळे सौदागर येथे घडली.
या प्रकरणी महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निखिल जोशी (वय-३२, रा. लंडन) आणि त्याची एक महिला साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी निखिल जोशी याची ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या ‘मेट्रोमोनियल वेबसाइट’वरून ओळख झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना फोन करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. तसेच, फिर्यादी यांना सोने, आयफोन आणि परदेशी चलन इंग्लंडवरून पार्सल पाठवत असल्याचे सांगितले. ते पार्सल घेण्याकरता ‘कस्टम ड्यूटी परदेशी चलन रुपांतरीत करण्यासाठी आणि भारतीय कर भरण्यास सांगून फिर्यादी यांची सात लाख ९७ हजार ७०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.
----
हिंजवडीतील महिलेला बदनामीची धमकी
पिंपरी : हातउसने घेतलेले दोन लाख ४० हजार परत मागितले असता, महिलेला ‘सोशल मीडिया’वर बदनामी करण्याची धमकी दिली. हा प्रकार २८ जानेवारी ते १८ मे या कालावधीत हिंजवडी परिसरात घडला. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आफताब युनिस अन्सारी (२४, रा. नवी दिल्ली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचा मुलगा आरोपी याने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख ४० हजार रुपये घेतले. फिर्यादी यांनी ते पैसे परत मागितले असता, आरोपीने फिर्यादींना हाताने मारहाण केली. तसेच, फिर्यादीचे फोटो ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ करत त्यांची बदनामी करण्याची आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
पिंपरी : गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन किलो गांजा जप्त केला. भोसरीतील लांडगेनगर येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (ता. १९) ही कारवाई केली.
अमर निवृत्ती जेधे (वय २८) व एक महिला (वय- ४०, दोघे रा. लांडगेनगर, भोसरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडगेनगर येथे दोघांनी विक्रीसाठी गांजा बाळगला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन किलो गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण एक लाख ८६ हजार २५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
---
‘स्पा सेंटर’मध्ये वेश्‍या व्यवसाय; दोघांवर गुन्हा
पिंपरी : ‘स्पा सेंटर’मध्ये सुरू असलेल्या वेश्‍याव्यवसायावर अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये दोन महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नवी सांगवीतील कृष्णानगर येथे करण्यात आली.
कुणाल राममूर्ती रेड्डी (वय- ३९, रा. बोपोडी) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक मारुती करचुंडे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून, ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय चालवला. आरोपींनी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना ‘स्पा सेंटर’मध्ये मसाजच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करून घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये ‘स्पा’ मालक कुणाल रेड्डी आणि एक महिला या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

हिंजवडीत महिलेची फसवणूक

पिंपरी : महिलेच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती घेऊन, तिच्या बँक खात्यावरून सहा लाख ७३ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार १ मे रोजी हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला.
याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १९) फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन करून त्यांच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर फिर्यादी यांच्या नावावर दोन लाख रुपये ‘ऑनलाईन पर्सनल प्री अप्रुवल लोन’ फिर्यादी यांच्या खात्यावर घेतले. त्यानंतर फिर्यादी यांच्या बॅंक खात्यातून सहा टप्प्यांमध्ये एकूण सहा लाख ७३ हजार ४९९ रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com