गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

चिंचवडमध्ये एकाला
कोयत्याने मारण्याचा प्रयत्न
चिंचवड : प्रेमप्रकरणातून तरुणाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी (ता. २१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिंचवड येथे घडली. अर्जुन नामदेव मोरे (२३, रा. इंदिरानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर संभाजी शिंदे (वय २३), गणेश शेट्टी (वय २५, रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मोरे यांची नातेवाईक महिला आणि आरोपी सागर यांच्यात प्रेमसंबंध होते. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकदा दोघांना रंगेहात पकडले. त्यावेळी सागर याने फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली. दरम्यान, रविवारी सायंकाळी फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत घराजवळ थांबले होते. त्यावेळी सागर शिंदे आणि त्याचा साथीदार गणेश शेट्टी दुचाकीवरून तेथे आले. दोघांनी फिर्यादी यांना कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी जीव वाचवण्यासाठी घरी पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

पोलिसांना फोन करणाऱ्याला चऱ्होलीत धमकी
चऱ्होली : मारहाण करणाऱ्यांना प्रतिकार करीत पोलिसांना फोन करणाऱ्या तरुणाला दोघा जणांनी कोयत्याने तोडण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवारी (ता. २१) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास चऱ्होली खुर्द येथे घडला. अजय निळकंठ साबळे (२३, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषी ऊर्फ रवी अंकुश कांबळे, अथर्व वरणकर (रा. चऱ्होली खुर्द) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांचे मित्र क्रिकेट खेळत असताना आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना ‘इथे क्रिकेट खेळायचे नाही. इथे खेळला तर तुझे हात पाय मोडीन’ ,अशी धमकी दिली. तसेच, फिर्यादी यांच्या हातातील बॅट आरोपींनी भिंतीवर आपटून फोडली. त्यानंतर काठीने मारून फिर्यादी यांना जखमी केले. त्यावेळी फिर्यादी पोलिसांना फोन करीत असताना आरोपींनी त्यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. ‘पोलिसांना सांगितले तर तुला कोयत्याने तोडतो’ अशी धमकी देऊन आरोपी दुचाकीवरून शिवीगाळ करीत निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.

मारुंजीत देशी दारूची वाहतूक
मारुंजी : दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करणाऱ्यास अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ६३ हजारांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. रविवारी (ता. २१) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मारुंजी येथे ही कारवाई करण्यात आली. सौरभ मोहन नायर (३१, रा. मामुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई मितेश यादव यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी त्याच्या दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करीत होता. या बाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून ६३ हजार ५०० रुपये किमतीचा देशी दारूचा बॉक्स जप्त केला. आरोपीने दारूचा बॉक्स मारुंजी येथील प्रथमेश वाईन्स शॉपमधून आणला असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

चिखलीत सोसायटी समोरून मोटार चोरीला
चिखली : सोसायटी समोर पार्क केलेली मोटार अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (ता. २१) सकाळी सहाच्या सुमारास ग्रीन्स पार्क हाउसिंग सोसायटी, मोरेवस्ती-चिखली येथे घडली. राम पोपट क्षीरसागर (४३, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी त्यांची चार लाख रुपये किमतीची मोटार शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या सोसायटी समोर पार्क केली होती. दरम्यान, अज्ञातांनी रात्रीच्या वेळी त्यांची मोटार चोरून नेली. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

बनावट कागदपत्रांद्वारे भोसरीत फसवणूक
भोसरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे नावात साधर्म्य असलेल्या खातेदाराच्या बँकेतून पाच लाख रुपये काढून घेतले. दरम्यान, मूळ खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार १८ ऑक्टोबर २०२१ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत भोसरी येथील रुपी सहकारी बँकेत घडला. रामशंकर बाबूराम
विश्वकर्मा (रा. दिघी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक राहुल नाईक यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०१३ मध्ये रुपी सहकारी बँकेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानंतर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यामुळे खातेदारांना बँकेतून पैसे काढता येत नव्हते.
दरम्यान, खातेदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्याबाबत ऑगस्ट २०२१ मध्ये मंजुरी मिळाली. खातेदारांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि खात्यासंबंधीची कागदपत्रे सादर करून पैसे घेण्याचे आवाहन बँकेने केले. त्यावेळी आरोपी रामशंकर विश्वकर्माने अर्ज केला. रक्कमेच्या पावत्या गहाळ झाल्या असल्याचे आरोपी रामशंकर विश्वकर्मा याने बँकेला बंधपत्र लिहून दिले. त्यासोबत त्याने पॅनकार्ड, आधारकार्ड, पासबुक देखील सादर केले. या बंधपत्रावर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी २२ मार्च २०२२ रोजी रामशंकर विश्वकर्मा याच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर पाच लाख रुपये हस्तांतरित केले. दरम्यान, शांती विश्वकर्मा यांनी पतीचे बँकेत मुदत ठेव खाते असून त्यांचे निधन झाल्याचे बँकेला सांगितले. मुदत ठेव असलेल्या पावत्या देखील शांती यांनी सादर केल्या. त्यावेळी आरोपी बनावट कागदपत्र सादर करून बँकेकडून पाच लाख रुपये घेऊन गेल्याचे समोर आले. बँकेने आरोपी विश्वकर्मा याच्याशी पत्रव्यवहार करून पैसे परत करण्यास सांगितले. त्याच्या बचत खात्यावरील रक्कम बँकेने वजा देखील केली. मात्र, उर्वरित चार लाख ३२ हजार ७७१ रुपये परत करण्यास आरोपीने टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

मोटारीच्या धडकेत आकुर्डीत बालकाचा मृत्यू
आकुर्डी : उघड्या दरवाजाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. आकुर्डी गावठाण चौकाजवळ रविवारी (ता. २१) हा अपघात झाला. शिवेंद्र आदेश विचारे (वय ३) असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचे वडील आदेश विष्णू विचारे (४२, रा. निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन वेगवेगळ्या मोटार चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दुचाकीवरून मुलांना घेऊन खंडोबा माळ येथील खंडोबाच्या दर्शनाला जात होते. त्यावेळी आरोपी चालवत असलेल्या मोटारीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. फिर्यादी यांची दुचाकी आरोपी चालवत असलेल्या मोटारीच्या उघड्या दरवाजाला धडकली. त्यामुळे फिर्यादी मुलांसह रस्त्यावर पडले. त्यावेळी समोरून वेगात येणाऱ्या दुसऱ्या मोटारीचे चाक शिवेंद्र याच्या अंगावरून गेले. यामध्ये शिवेंद्रचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दोन्ही वाहन चालक तेथे न थांबता तेथून पळून गेले. निगडी आरोपींचा शोध घेत आहेत

दापोडीत तरुणीच्या वडिलांना धमकी
दापोडी : तरुणीचा पाठलाग करून तिच्याकडे फोन नंबर मागण्याचा तगादा लावणाऱ्या तसेच, तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (ता. २०) रोजी दापोडी येथे घडली. या प्रकरणी पीडितेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी प्रदीप काटे यास अटक केली आहे. आरोपी दुचाकीवरून फिर्यादी यांचा पाठलाग करीत होता. दरम्यान, त्याने फिर्यादी यांना अडवून मोबाईल नंबर देखील मागितला. फिर्यादी यांनी नंबर देण्यास नकार दिला असता त्याने आरडाओरडा करीत तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या घराजवळ जाऊन त्यांना त्रास दिला. या बाबत पीडितेने तिच्या वडिलांना सांगितले. त्यानुसार, तरुणीचे वडील आरोपीला समजावत होते. त्यावेळी आरोपीने पीडितेच्या वडिलांना शिवीगाळ करीत धमकी दिली. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

घरफोडी करणाऱ्या दोघांना चाकणमध्ये अटक
चाकण : कटावणीच्या साहाय्याने घरफोडी करणाऱ्या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (ता. २१) चाकण येथील वृषभ समृद्धी सोसायटी येथे ही घटना घडली. याप्रकरणी अखिल जॉन (२९, रा.चाकण) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, रोशन अरविंद सोनावणे (२५, रा. कुरुळी) व शुभम हनुमंत वाघमारे (२३, रा. कुरुळी) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सायकलच्या कटावणीने फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यांनी घरातील बॅग व महागडा गॉगल असा एकूण दोन हजार नऊशे रुपयांचा ऐवज चोरला. चाकण पोलिस तपास करीत आहेत.