गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त
--------

मोबाईल नंबर न दिल्याने
तरुणीला सिमेंट गट्टूने मारहाण
चिंचवड ः मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्याने तरुणाने थेट तरुणीच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टू घातला. हा प्रकार रविवारी (ता. २१) लिंकरोड, चिंचवड येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शाहरुख हुसेन शेख (३०, रा. चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला मोबाईल नंबर मागितला. त्यावेळी तरुणीने नंबर देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने तरुणीला सिमेंट ब्लॉकने डोक्यात मारून जखमी केले. तसेच, शिवीगाळ करीत धमकी दिली.
मारुंजीत विवाहितेची आत्महत्या
हिंजवडी ः सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मारुंजी येथे रविवारी (ता. २१) घडला. ज्ञानेश्वरी राहुल कराड (वय- २३, रा. मारुंजी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेचे वडील तुकाराम सुदाम केंद्रे (वय- ५३, रा. अहमदपूर, लातूर) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती राहुल सदाशिव कराड, सासरा सदाशिव कराड आणि सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा ७ मे २०१९ रोजी आरोपीशी विवाह झाला. मात्र, लग्नात गादी व बेड दिला नाही, या कारणाने आरोपींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान, पतीला टेम्पो घ्यायचा आहे, असे म्हणून आरोपींनी विवाहितेला माहेराहून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली. शेवटी या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


चिंचवडमध्ये महिलेला मारहाण
चिंचवड : किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (ता. २१) चिंचवड येथील विजयनगर झोपडपट्टी येथे घडली. या प्रकरणी महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराजवळील दोन रिकाम्या खोल्या आहेत. दरम्यान, खोल्यावरून झालेल्या वादातून आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या घरासमोर शिवीगाळ केली. तसेच, फिर्यादी यांच्याशी झटापट केली. यामध्ये फिर्यादी यांचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तुटून नुकसान झाले आहे.


समाजात प्रतिष्ठा वाढू लागल्याने
चिखलीतील तरुणाचा खून

पिंपरी, ता. २३ ः कृष्णा ऊर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय- २१, रा. महादेवनगर, चिखलीगाव) याच्या खूनप्रकरणी सौरभ ऊर्फ सोन्या पानसरे, सिद्धार्थ कांबळे (दोघे रा. फलकेवस्ती, मोईगाव, ता. खेड) आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी त्याचे मामा राजेंद्र कैलास कार्ले (रा. चांदूस, ता. खेड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी नवरात्री उत्सवात विकास साने यांनी पाटीलनगर, चिखली येथील मैदानावर दांडिया कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात कृष्णा आणि आरोपी यांचे भांडण झाले होते. त्यानंतर कृष्णा याची चिखली परिसरात प्रतिष्ठा वाढू लागली होती. याचा राग मनात धरून, आरोपींनी कट रचून कृष्णा याला ठार मारण्याचे नियोजन केले. दरम्यान, सोमवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास कृष्णा याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कृष्णाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
-------------
प्रेरणा कट्टे, अमृतकर यांच्या बदल्या
पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, काहींना बढती

पिंपरी, ता. २३ : राज्य पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या आणि बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. गृह विभागाने सोमवारी याबाबतचे आदेश दिले आहेत. यामध्ये पिंपरी- चिंचवड आयुक्तालयातील सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे, प्रशांत अमृतकर, श्रीकांत डिसले यांचा समावेश आहे.

शहरातून गेलेले अधिकारी
गुन्हे शाखेचे प्रशांत अमृतकर यांची पोलिस उपअधीक्षक गडचिरोली येथे बदली झाली आहे. तर, चाकण उपविभागाच्या सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची पोलिस उपअधीक्षक चिमूर, चंद्रपूर येथे बदली झाली आहे. वाकड उपविभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डीसले यांची पोलिस उपअधीक्षक नंदुरबार येथे बदली करण्यात आली आहे. दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांची पोलिस उपअधीक्षक औसा, लातूर येथे बढतीने बदली झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांची पोलिस उपअधीक्षक अहमदपूर, जि. लातूर येथे बढतीने बदली झाली आहे.

शहरात आलेले अधिकारी
सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या अक्कलकोट उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्रसिंह गौर तसेच गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथील पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब कोपनर यांची पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलात सहायक पोलिस आयुक्त पदावर बदली झाली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलातील हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर बढती मिळाली आहे. सतीश कसबे यांचीदेखील पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलात सहायक पोलिस आयुक्त पदावर बढतीने पदस्थापना करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com