अठरा उंबऱ्यांच्या थेरगावात क्रिकेटचा प्रभाव

अठरा उंबऱ्यांच्या थेरगावात क्रिकेटचा प्रभाव

आधी ग्रुपग्रामपंचायत. नंतर स्वतंत्र ग्रामपंचायत. ११ ऑक्टोबर १९८२ रोजी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेत समावेश. तेव्हापासून महापालिकेचे एक उपनगर अशी ओळख. तेव्हा अवघे १८ घरांचे व पाचशे लोकसंख्या असलेलं गाव म्हणजे थेरगाव. आज ४० वर्षांत चहुबाजूंनी विस्तारले आहे. साहित्य कला, क्रीडा, शिक्षण, उद्योग, सामाजिक, राजकारण, आध्यात्मिक क्षेत्रात लौकिक मिळवला आहे. आपला वेगळा ठसा उमटवला आहे. महापालिकेच्या माध्यमातून क्रिकेट अकादमी उभारली आहे. त्यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्थरावर चमकदार कामगिरी करणारे दर्जेदार क्रिकेटपटू घडत आहेत.
- बेलाजी पात्रे
----------
शेकडो वर्षांपूर्वी थेरगाव गावठाण हे पवना नदीकाठी श्री केजू देवी मंदिराच्या आसपास होते. पवना नदीत त्या काळी मोठ्या मगरींचे साम्राज्य होते. या अकराळ विकराळ मगरींनी गावातील काही माणसांचे जीव घेतले. त्यानंतर गावकऱ्यांनी नदीकाठापासून थोडे दूर आश्रय घेतला. तेच आजचे थेरगाव गावठाण, असे सांगितले जाते. शिवाय, महायान पंथास ‘थेरवादी संप्रदाय’ म्हणण्याचा प्रघात आहे. थेरवादी महापंडितांच्या वास्तव्याच्या परिसराचं नामानिधान पुढे थेरगाव असं झालं असावं, असे प्रसिद्ध साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी नमूद केले आहे.

शेतीसोबत जोडली नाती
पूर्वी शेती हेच उत्पन्नाचे साधन होते. लाल मातीच्या घामाने चिखल करणारी नामवंत पहिलवान मंडळी शेतीत मेहनत करायची. गहू, ज्वारी, बाजरी व कडधान्य अशी पिके घेतली जायची. त्याकाळी बहुतेकजण रोजगारासाठी मुंबईची वाट धरत होते. दोन-चार महिने कमाई करून, पुन्हा परतीच्या मार्गावर बैलगाड्या लागत. काही जणांचा दूध व्यवसाय होता, तर काहीजण गवताचा भारा डोक्यावर घेऊन, चारा विक्रीसाठी शनिवारवाडा गाठत. आता गावपण जाऊन स्मार्ट थेरगाव उदयास आले आहे. थेरगावात आता चहुबाजूंनी गगनचुंबी इमारती, पूल, सिमेंट काँक्रीटचे प्रशस्त रस्ते, रुग्णालय जलतरण तलाव, क्रीडांगणे, उद्याने आहेत.

क्रिकेट अकादमी
दळण-वळण व आठवडे बाजारासाठी डांगे चौक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. याच चौकालगतचे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि उद्यानातील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा वैशिष्ट्येपूर्ण आहे. गावठाणाजवळ साडेचार एकरात २००८ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका, व्हेरॉक कंपनी आणि क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या माध्यमातून क्रिकेट अकादमी सुरू झाली. तीच आजची पीसीएमपीज् व्हेरॉक वेंगसरकर अकादमी. थेरगावची एक ओळख बनली आहे. अकादमीचे उद्‍घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर व महेंद्रसिंग धोनी यांच्या हस्ते झाले आहे.

वैशिष्ट्ये
- दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी
- डांगे चौकातील बीआरटी दुहेरी पूल व ग्रेडसेपरेटर
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व उद्यान
- पवना नदी परिसरात केजुदेवी मंदिर, उद्यान व बोट क्लब
- लक्ष्मीबाई बारणे उद्यान
- सोयी सुविधांयुक्त महापालिकेचे अद्ययावत रुग्णालय
- नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन
- खिंवसरा पाटील जलतरण तलाव
- थेरगाव व ताथवडे हद्दीत ब्रिटिश सैन्याच्या छावणीच्या खुणा
- पद्‍मजी पेपर मिलमुळे अनेकांना रोजगार

पूर्वी जमिनीतील कुंदा व हरळी गवतामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम व्हायचा. पद्‍मजी पेपर मिलचे पाणी शेतीत साठू लागले आणि उपद्रवी गवते नामशेष झाली. त्यानंतर शेतीत सुधारणा केल्याने भरघोस भात व ऊस शेती होऊ लागली. गावातील मंदिराचा जीर्णोद्धार केला. १९८२ मध्ये गावाचा समावेश महापालिकेत झाला आणि विकासाचा आलेख उंचावत गेला.
- बाळासाहेब बारणे, माजी सरपंच, थेरगाव

आम्ही गावात राहायला येऊन, थोडेच दिवस झाले होते. तेव्हाच गावाचा समावेश महापालिकेत झाला. त्यानंतर काहीच वर्षांत उत्तम पायाभूत सुविधा मिळू लागल्या. प्रशस्त रस्ते, मुबलक पाणी, उद्याने,
मोठमोठे मॉल्स आता परिसरात दिसू लागले आहेत. दळणवळण व सक्षम वाहतूक व्यवस्थेमुळे विनाअडथळा ये-जा करता येते. शहरीकरणामुळे गावाचा चेहरामोहरा बदलला आहे.
- सतीश गुरव, रहिवासी, थेरगाव
--
फोटोः 44917, 44918

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com