चिंचवडमध्ये नाविण्यपूर्ण ‘चित्र पर्व’ प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमध्ये नाविण्यपूर्ण ‘चित्र पर्व’ प्रदर्शन
चिंचवडमध्ये नाविण्यपूर्ण ‘चित्र पर्व’ प्रदर्शन

चिंचवडमध्ये नाविण्यपूर्ण ‘चित्र पर्व’ प्रदर्शन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ : आर्ट गॅलरी ऐवजी चक्क फर्निचर शोरूममध्ये भरविलेले अनोखे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी कला रसिकांची गर्दी होत आहे. पूर्ण सजवलेल्या लिव्हिंग किंवा बेडरूम रूममध्ये एखादे चित्र कसे दिसेल याचे प्रात्यक्षिक या प्रयोगाव्दारे केले आहे. गेली ४० वर्षे चित्रकला क्षेत्रात असलेल्या शरद तरडे आणि सुचिता तरडे या दाम्पत्याची अमूर्त (ॲबस्ट्रॅक्ट) प्रकारातील वेगवेगळ्या आकाराची ५५ चित्रे येथे लावली आहेत. `चित्र पर्व’ अशी याची संकल्पना आहे.

चिंचवडमधील चिंचवडे चौकातील `सुहास एकबोटे फर्निचर शोरूम’मध्ये चार जूनपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत प्रदर्शन पाहण्यासाठी खुले आहे. येथे लावलेले प्रत्येक चित्र वेगवेगळ्या रंगसंगती आणि आकाराचे आहे. कॅनव्हासवर आणि पेपरवर ती चित्रित केली आहेत. शिवाय फायबर ग्लास, स्टेन ग्लास, फॅब्रिक कोलाज आणि या माध्यमांचा वापर करूनही अनेक रचना प्रदर्शनात मांडल्या आहेत. घर सजावटीसाठी लागणाऱ्या शोरूममधील अनेक वस्तू, गळ्यातील आभूषणे आदी कलात्मक वस्तूही येथे लावल्या आहेत.

प्रदर्शनाविषयी ‘सकाळ’ शी बोलताना तरडे दाम्पत्य म्हणाले, “एखाद्या आर्ट गॅलरीमध्ये लावलेली चित्रे आपल्या घरी लावल्यावर कशी दिसतील याची कल्पना लवकर येत नाही. म्हणून सुसज्ज अशा फर्निचर शोरूममध्ये जर आपण चित्रे लावली, तर कदाचित त्या फर्निचर सोबत एकसंधपणे अनुभवता येईल असे वाटले आणि या प्रदर्शनाची सुरुवात झाली. फर्निचर शोरूम आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात, परंतु तिथे चित्रे नसतात. जर या शोरूम आणि मोठ्या मॉलमधून चित्र प्रदर्शने सुरू झाली, तर येता जाता लोकांना त्याबाबत उत्सुकता वाढेल. यातून चित्र साक्षरता येईल असे आम्हाला वाटते.”

प्रदर्शना निमित्त इतरही कलांना वाव मिळावा म्हणून शनिवारी (ता.२७) सायंकाळी सहा वाजता डॉ. धीरज कुलकर्णी व सहकारी यांचे कविता वाचन व रविवारी (ता.२८) सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत चित्र प्रात्यक्षिक होणार आहे.

कोट
या नव्या प्रयोगात आम्हाला आमची अमूर्त चित्रे ही अत्यंत वेगळ्या रीतीने लोकांसमोर आणायची होती. ती मांडण्याचे स्वातंत्र्य एकबोटे यांनी आम्हाला दिले. चित्रातल्या रंग भावना, आकार, अवकाश आणि रंगांचे एकमेकांशी असलेले नाते समजून घेऊन ती पहावीत असे आम्हाला वाटते.
- शरद तरडे व सुचिता तरडे, चित्रकार
--
येथे आल्यावर तुम्हाला स्वतःच्या घरात आल्याचा भास होईल. येथे मांडलेल्या प्रत्येक गोष्टीतला कलापूर्ण विचार तुम्हाला एका वेगळ्याच कलाविश्वात नेईल याची आम्हाला खात्री आहे.
- सुहास एकबोटे