देहूतील विविध समस्या पाच जूनपर्यंत सोडवा अप्पर तहसीलदार अर्चना निकम यांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूतील विविध समस्या
पाच जूनपर्यंत सोडवा
अप्पर तहसीलदार अर्चना निकम यांचे आदेश
देहूतील विविध समस्या पाच जूनपर्यंत सोडवा अप्पर तहसीलदार अर्चना निकम यांचे आदेश

देहूतील विविध समस्या पाच जूनपर्यंत सोडवा अप्पर तहसीलदार अर्चना निकम यांचे आदेश

sakal_logo
By

देहू, ता. २४ ः आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या १० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकारच्या विविध खात्याच्यावतीने समस्यांचे निराकरण येत्या ५ जूनपर्यत करा, असा आदेश पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदार डॅा. अर्चना निकम यांनी बुधवारी देहू येथे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिला. पाच जूननंतर काम पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येईल.
देहूतील देऊळवाड्यात झालेल्या आढावा बैठकीत संत तुकाराम महाराज संस्थान आणि शासनाच्या विविध खात्याकडून कामांची माहिती तहसीलदार अर्चना निकम यांनी घेतली.
संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, नगरपंचायत सदस्य योगेश काळोखे, योगेश परंडवाल, प्रवीण काळोखे, झोन दोनचे पोलिस उपायुक्त के. ए. डोळे, डॅा. सचिन सूर्यवंशी, डॅा. किशोर यादव, महेश वाघमारे, श्रीराम ढोकणे व विविध खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे म्हणाले, ‘‘पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, वीज आणि आरोग्य सुविधा मिळाव्यात. तसेच ज्या ठिकाणी वारकरी मुक्काम आहे, त्याठिकाणी देहू नगरपंचायतीने औषध फवारणी करावी. भाविकांना अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्याचे वाटप पिण्यासाठी करण्यात येते. त्या पाण्याचे नमुने तपासावेत. अन्यथा गेल्या वर्षी अनेक भाविक आजारी पडले होते. तसेच इंद्रायणी घाटावर दिवे बसविण्यात यावेत. जलपर्णी काढावी.’’
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम म्हणाले, ‘‘पालखी सोहळ्या दरम्यान विविध खात्याच्या अधिकाऱ्यांशी जोडणारी कंट्रोलरूम बनविण्यात येणार आहे. तसेच सर्वांचे मोबाईल नंबर उपलब्ध असणार आहेत. स्वच्छ पाण्यासाठी काळजी घेण्यात येत आहे. पिण्याचे पाण्याचे टॅंकर, फिरते शौचालय उपलब्ध करून देणार आहे.’’
पोलिस यंत्रणा, आरोग्य विभागानेही काही सूचना मांडल्या. प्रस्थान सोहळ्यानिमित्त होणारी देऊळवाड्यातील गर्दी टाळण्यासाठी पासेसची व्यवस्था संस्थानने करावी, अशा सूचना उपायुक्त डोळे यांनी दिल्या.