
गुन्हे वृत्त
पिस्तूल बाळगणाऱ्या
गुन्हेगाराला अटक
पिंपरी ः पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. सोमवारी (ता. २३) खेड तालुक्यातील कोरेगाव येथे ही कारवाई करण्यात आली.
आकाश अण्णा भोकसे (वय २३, रा. कुरकुंडी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांना माहिती मिळाली की, कोरेगाव येथील एका कंपनीजवळ आरोपी आकाश भोकसे हा पिस्तूल घेऊन येणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा लावला. मात्र, पोलिसांची चाहूल लागली असता, तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी आकाश हा सराईत गुन्हेगार आहे.
आळंदीत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी : भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १९) रात्री दहाच्या सुमारास आळंदी येथे घडली.
प्रदीप वसंत पारवे (वय ३३, रा. काळेवाडी झोपडपट्टी, आळंदी) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार गणेश कळके यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरगावमध्ये हातभट्टी अड्ड्यावर छापा
शिरगाव ः हातभट्टी अड्ड्यावर छापा मारून, पोलिसांनी सहा लाख ८५ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. सोमवारी (ता. २२) रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या बाजूला शिरगाव येथे ही कारवाई करण्यात आली. रूपेश ईश्वर पवार (वय २६, रा. कंजारभाट वस्ती, शिरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार समाधान फडतरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी रुपेश पवार याचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाजवळ हातभट्टी दारू तयार करण्याचा अड्डा होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता, त्यांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी रूपेश पवार पळून गेला. या कारवाईत पोलिसांनी आठ हजार लिटर कच्चे रसायन, २४५ लिटर हातभट्टी दारू, पत्राच्या टाक्या, ॲल्युमिनियमचे भांडे, असा एकूण सहा लाख ८५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
चिखलीत जागमालकांवर गुन्हा
चिखली: कामासाठी विलंब होत असल्याने जागेच्या मूळ मालकांनी विकासकाला धमकी दिली. तसेच, विकसनाचे काम करण्यास प्रतिबंध करीत कामगारांना मारहाण केली. ही घटना १७ मे ते २२ मे या कालावधीत चिखली येथे घडली.
प्रशांत जालिंदर हिंगे (वय ३३, रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिरुद्ध राजेंद्र जाधव, प्रणव वासुदेव जाधव, मयूर संजय जाधव, गणेश चांगदेव जाधव, अनिकेत अरुण जाधव, कुमार राजेंद्र जाधव, एक महिला (सर्व रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करीत असलेल्या कंपनीने आरोपींकडून सन २०१३ मध्ये त्यांची जमीन विकसन करण्यासाठी घेतली. दरम्यान, परवाने आणि मंजुरीसाठी वेळ लागल्याने विकसनाच्या कामास कंपनीकडून विलंब झाला. कंपनीकडून जागा मालक आणि त्यांच्या वारसदारांना वेळोवेळी विलंब दंडाचा धनादेश देण्यात आला. यापुढे देखील विलंब दंडाची रक्कम देण्यास फिर्यादी यांच्या कंपनीची संमती होती. मात्र, आरोपींनी विकसन सुरू असलेल्या बांधकाम साईटमध्ये अतिरिक्त क्षेत्राची मागणी केली. आरोपींची मागणी मान्य नसल्याने कंपनीकडून ती मागणी अमान्य करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली. तसेच, कामगारांना शिवीगाळ करून काम बंद पाडले, असे फिर्यादीत नमूद आहे.
देहूत चोरी करणाऱ्यास अटक
देहूरोड ः कंपनीत चोरी करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (ता. २३) रात्री दीडच्या सुमारास विठ्ठलवाडी, देहूगाव येथील अग्रवाल मेटल्स या कंपनीत घडली.
सोनूकुमार श्रीराम सुंदर सरोज (वय २२, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दस्तगीर रशीद पठाण (वय ४७, भोसरी. मूळ रा. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू
पिंपरी : मोटारीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात १७ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सुतारवाडी, बावधन येथे घडला.
राजू बबन गावडे (वय ५२, रा. सुतारवाडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार राजेंद्र कुरणे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.