
पिंपरी बाप्पाचे आगमन चांगले रस्ते
चकचकीत रस्त्यांवरून गणरायाचे आगमन
शहरातील स्थिती; वाकड, भोसरीत दोन रस्त्यांची कामे; काळेवाडी, चिखलीत खड्डे
पिंपरी, ता. १९ ः वाकड, भोसरीतील एक-दोन रस्त्यांची कामे सुरू आहेत. चिखली, काळेवाडीतील एक-दोन मुख्य व काही अंतर्गत रस्त्यांवर खड्डे आहेत. यांचा अपवाद वगळता यावर्षी लाडक्या गणरायाचे आगमन चकचकीत व ‘स्मार्ट’ रस्त्यांवरून झाले. त्यामुळे विनाअडथळा मिरवणुका निघाल्या. गणेशोत्सवापूर्वीपर्यंत आगमन व विसर्जन मिरवणूक मार्गांवरील ९७ टक्के खड्डे बुजवल्याचे प्रशासनाने सांगितले.
पावसाळ्याच्या उत्तरार्धात गणेशोत्सव असतो. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडलेले असतात. याही वर्षी अशीच स्थिती होती. पावसाळ्यात डांबराचे प्रकल्प बंद असतात. त्यामुळे डांबराअभावी खड्डे तसेच राहात होते. यावर्षी प्रशासनाने कोल्डमिक्स, मुरूम, खडी, पेव्हिंग ब्लॉकने खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला होता. त्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यलयस्तरांवर सोपवली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला किंवा पावसाने ओढ दिल्यानंतर खड्डे बुजवण्याची कार्यवाही केली जात होती. शिवाय, संपूर्ण पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणीच्या काही भागात स्मार्ट सिटी आणि शहराच्या अन्य भागात अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजनेंतर्गत रस्त्यांची कामे केली जात आहेत. काही रस्ते डांबरी, काही रस्ते कॉंक्रिटचे केले जात आहेत. पदपथ स्मार्ट केले जात आहेत. अशा रस्त्यांवर यंदा लाडक्या गणरायाचे आगमन झाले.
अडथळ्यांचे मार्ग
- वाकड येथील दत्त मंदिर रस्त्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे
- वाडक पोलिस ठाण्यासमोरील काळाखडक रस्त्यावर खड्डे आहेत
- पिंपरी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज (एमएम) चौक रस्त्यावर खड्डे
- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता, शिवार चौकात खड्डे
- चिखली-आकुर्डी रस्त्यावर कुष्णानगर चौकापर्यंत खड्डे
- चिखलीतील अंगणवाडी, जाधववाडी व कुदळवाडी रस्त्यावर खड्डे
- भोसरी पीसीएमटी चौक ते लांडेवाडी चौक रस्त्याचे काम सुरू आहे
गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे नियोजन केले होते. सोमवारपर्यंत ९७ टक्के खड्डे भरले आहेत. त्यासाठी हॉटमिक्स, कोल्डमिक्स, खडी, मुरूम वापरले आहे. साधारण १४०० किलोमीटरचे रस्ते शहरात आहेत.
- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका