पिंपरी-चिंचवड शहर बनत आहे गुटख्याचे आगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gutkha
गुटख्यावरील कारवाईबाबत उदासीनता टपऱ्या व दुकानांत खुलेआम विक्री, कारवाईत लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

Pimpri Gutkha : पिंपरी-चिंचवड शहर बनत आहे गुटख्याचे आगार

पिंपरी - गुटखा विक्रीला बंदी असतानाही शहरात ठिकठिकाणी टपऱ्यांवर गुटखा उपलब्ध होत असून, त्याचा साठा व विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मागील काही दिवसांत झालेल्या कारवाईवरून समोर येत आहे. विक्रीचे प्रमाण पाहता शहर गुटख्याचे आगार बनत असल्याचे दिसून येत आहे. गुटखा पुरविणाऱ्यांच्या मुळापर्यंत जाऊन सर्व रॅकेट उद्धस्त करणे गरजेचे आहे.

गुटखा विक्रीला सर्वत्र बंदी असल्याने टपऱ्यांवर व दुकानांवर खुलेआम विक्री होत नसली तरी छुप्या पद्धतीने विक्री सुरूच आहे. पोलिसांकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याने गुटखा विक्री करणारेही बिनधास्त सुटले आहेत. दरम्यान, मागील आठवडाभरात पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या युनिट दोन, तीन तसेच दरोडा विरोधी पथक व खंडणी विरोधी पथकासह हिंजवडी पोलिसांकडून कारवाई झाली. लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

महिना कारवाई जप्त माल

जानेवारी १ १ लाख ३ हजार ५९५

फेब्रुवारी १ ८ हजार ५५१

मार्च ४ ४४ लाख ९२ हजार ८३९

मार्चमधील कारवाई

१९ मार्च

- पुनावळे येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने ४४ लाख वीस हजारांचा गुटखा जप्त.

- दरोडा विरोधी पथकाने पिंपळे निलख येथे केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत १७ हजारांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला.

२१ मार्च

चाकण, आळंदी फाटा येथून गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाकडून २ लाख ९४ हजारांचा गुटखा जप्त.

२४ मार्च

खंडणी विरोधी पथकाकडून तळेगाव दाभाडे येथे २ लाख ९४ हजारांचा गुटखा जप्त.

२५ मार्च

- हिंजवडी पोलिसांनी भूगाव रोड येथून नऊ लाख ९५ हजारांचा गुटखा जप्त

- गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाकडून निगडीतील अजंठानगर येथून एक लाख १८ हजारांचा गुटखा जप्त.

- गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाकडून देहूरोड येथील पटेल रोड येथून पाच लाख ५१ हजारांचा गुटखा जप्त.

काही दिवसांपूर्वीच गुटखा पुरविण्याच्या मुळापर्यंत जाऊन चाकण येथे मोठी कारवाई केली होती. आताही कारवाया सुरूच आहेत. मागील काही दिवसात जो गुटखा पकडला आहे. त्यांच्या मुळापर्यंत जात त्याचा साठा व विक्री करणाऱ्यांसह गुटखा पुरविणाऱ्यांपर्यंत जाऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

- सतीश पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी-चिंचवड.