
चोरीच्या २५ दुचाकी जप्त
पिंपरी, ता. २७ : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सराईत दुचाकी चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या २५ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २१ गुन्हे उघडकीस आले आहेत.
प्रदीप अश्रृबा गायकवाड (वय २५, रा. मोहा,ता. परळी वैजनाथ, जि. बीड) व आकाश अनिल घोडके (वय २१, रा. भीमक्रांतीनगर, पत्राशेड, आझाद चौक, निगडी) अशी आरोपींची नावे आहेत. इरफान मेहबूब शेख (वय १९, रा. उड्डाणपुलाखाली गौतमनगर, परळी, बीड) व अमजद जाफर खान (रा. हर्षदा सोसायटी, लिंकरोड, चिचवड) अशी चोरलेली वाहने विकत घेणाऱ्यांची नावे आहेत.
प्रदीप हा टाटा मोटर्स कंपनीत हेल्पर म्हणून कामाला होता. गायकवाड याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्यावर नजर ठेवून सीसीटीव्ही फ़ुटेजची तपासणी केली असता तो दर चार दिवसांनी तो परळीला जात असल्याचे समोर आले. त्याच्यावर संशय वाढल्याने त्याला परळी येथून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चोरीची दुचाकी सापडली. चौकशी केली असता टाटा मोटर्स परिसरातून सुरुवातीला एक दुचाकी चोरून इरफान याला विकल्याचे सांगितले. त्यातून चांगले पैसे मिळू लागल्याने व त्याला दारुचे व्यसन असल्याने व्यसनाकरिता तो दुचाकी चोरू लागला. या दुचाकी इरफानला विकल्या. त्यानंतर इरफानने या दुचाकी बीड परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना विकल्याचे तपासात समोर आले. त्यांच्याकडून २१ दुचाकी जप्त केल्या.
दुसऱ्या घटनेत पोलिसांनी निगडी येथील आकाश घोडके याला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी व एक महागडी सायकल जप्त केली. चोरीच्या दुचाकी विकत घेणारा अमजद खान यालाही अटक केली. या कारवाईत चिखली ठाण्यातील ९, निगडी व पिंपरीतील प्रत्येकी ५, वाकड तळेगाव दाभाडे ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.