
गुन्हे वृत्त
अल्पवयीन मुलाला टोळक्याकडून बेदम मारहाण
पिंपरी : मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून टोळक्याने सतरा वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. कोयत्याने वार केल्याने या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना काळेवाडी येथे घडली. नन्या ठोकळ (वय १८, पिंपरी), जुनैद शेख (वय १९), कृष्णा बॉक्सर (वय २०), रोहित रोकडे (वय १८), राहुल रोकडे (वय १९, सर्व रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी काळेवाडीतील विजयनगर येथील सतरा वर्षीय मुलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी ठोकळ यास फिर्यादीच्या मामाच्या मुलाला का मारले? याचा जाब विचारला. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला रस्त्यात गाठले. जुनैद याने त्यांच्या हातावर कोयत्याने वार करून जखमी केले. तर ठोकळ, कृष्णा व रोहित यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी तेथून पळून जात असताना जुनैद याने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले.
------------------------
महिलेची दुचाकी अडवून धमकी देत रोकड लुटली
तिघांनी महिलेची दुचाकी अडवून धमकी देत तिच्याकडील रोकड लुटल्याचा प्रकार चिंचवड येथे घडला. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार करण ऊर्फ ससा ससाणे (रा. दत्तनगर, पिंपरी), शुभम फरतडे (रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) व त्याचा एक साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून जात असताना आरोपींनी मोहननगर येथील ग्रीयर कंट्रोल कंपनीसमोरील रस्त्यावर त्यांची दुचाकी अडवली. फिर्यादीला धमकी देत त्यांच्या शर्टच्या खिशातून जबरदस्तीने बाराशे रुपयांची रोकड काढून घेतली.
----------------------------
भोसरीत दोघांना दगडाने मारहाण
किरकोळ कारणावरून दोघांना दगडाने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरी येथे घडला. नागेश सोनवणे (वय २९, रा. आरोळे चाळ, गुळवे वस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे आरोपीच्या गाडीवर उभे राहून डिशचा गट्टू बसवत होते. या कारणावरून आरोपीने फिर्यादीसह आणखी एकाच्या डोक्यात दगड मारून जखमी केले.
------------------
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप धाटे (वय ४०, रा. पाटीलनगर, देहूगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार कुदळवाडी, चिखली येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच प्रभागात कचरा गाडीवर काम करतात. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर आरोपीने फिर्यादीला लग्नाचे व सांभाळ करण्याचे आमिष दाखवले. वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केला. यामध्ये फिर्यादी गर्भवती राहिली.
-----------------------
रोकड लुटून जिवे मारण्याची धमकी
रोकड लुटून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भोसरी येथे घडली. उमेश विष्णू भालेराव (रा. मु.पो. भोसे, ता. खेड, मूळ- बीड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने भोसरी येथे फिर्यादीकडून बियर घेतली. त्यानंतर फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील नऊ हजार ६०० रुपयांची रोकड जबरदस्तीने घेऊन गेला. दरम्यान, पोलिसात तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.