टाटा कंपनीचे ऋण फेडण्याचे काम बापट यांनी केले

टाटा कंपनीचे ऋण फेडण्याचे काम बापट यांनी केले

टाटा मोटर्स परिवार व कामगारांप्रती स्नेह कायम
गिरीश बापट परिवहनमंत्री असताना एसटी महामंडळासाठी एक हजार बसगाड्यांची खरेदी

पिंपरी, ता. २९ : दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी टाटा मोटर्स कंपनीत कामगार म्हणून काम केले. त्यांच्या राजकीय उभारणीत टाटा मोटर्स परिवाराचे मोठे सहकार्य होते. ही भावना त्यांनीही अनेकवेळा बोलून दाखविली. परिवहन मंत्री झाल्यानंतर २००० मध्ये त्यांनी एसटी महामंडळासाठी टाटा मोटर्सकडून एक हजार बस गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ज्या कंपनीच्या मदतीमुळे आपण मोठे झालो, त्या कंपनीचे ऋण फेडण्याचे काम त्यांनी त्यावेळी केले. ही भावना टाटा मोटर्सच्या कामगारांमध्ये निर्माण झाली होती. कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यामुळेच टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्यावतीने तत्कालीन पदाधिकारी शिवाजी शेडगे, सुजित पाटील, एकनाथ पवार यांनी त्यांचा मोठा सत्कार चिंचवड येथे केला होता.
बापट यांचे निधन झाल्यानंतर टाटा मोटर्सच्या विद्यमान व निवृत्त कामगारांमध्ये या आठवणी जाग्या झाल्या.
बापट यांनी टाटा मोटर्स (त्यावेळची टेल्को) कंपनीत १९७३ मध्ये स्टोअर्स विभागात काम करण्यास सुरवात केली. १९८३ मध्ये नगरसेवक झाल्यावर व नंतर आमदार झाल्यावरही निवृत्तीपर्यंत कंपनी त्यांना पगार देत होती. एकप्रकारे ते ऑन ड्यूटी समाजसेवा करत होते. टाटा मोटर्समुळे मला राजकारणात काम करण्याची संधी मिळाली, असे ते आवर्जून सांगायचे. त्यामुळेच त्यांनी आमदार, मंत्री झाले तरी टाटा मोटर्स परिवाराचा स्नेह कायम ठेवला. टाटा मोटर्स परिवाराची नाळ त्यांनी तुटू दिली नाही.

‘‘आमदार, मंत्री झाले तरी गिरीश बापट टाटा मोटर्स कामगार व मित्र परिवाराबरोबर ‘गेट टुगेदर’ करायचे. त्यांच्या करिअरची सुरवात टाटामधून झाल्यामुळे शेवटपर्यंत टाटा परिवाराच्या संपर्कात होते. ते कायम कंपनीत येत असत. कामगारांचे शासन दरबारी असणारे प्रश्‍न सोडविण्यासाठी ते कायम मदत करत.
- नामदेव ढाके, माजी पदाधिकारी, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन.

‘‘गिरीश बापट यांचे टाटा मोटर्सच्या कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. कामगार वेतन कराराच्यावेळी वाटाघाटी करताना युनियनला ते कायम मार्गदर्शन करायचे. त्यांनी कधीही पक्षीय भेदाभेद केला नाही. त्यांना कंपनीकडून मिळणारे वेतन ते स्वत:साठी न वापरता, समाजोपयोगी कामासाठी वापरत असत.
- सुजित पाटील, माजी अध्यक्ष, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन.

टाटा मोटर्स युनियनमध्ये सर्वपक्षीय लोक होते. परंतु; गिरीश बापट यांनी कधीही युनियनच्या राजकारणात ढवळाढवळ केली नाही. ज्या वेळी त्यांना कोणी कामगार नेत्यांनी मदत मागितली तर; त्यांनी ती तत्परतेने केली. टाटा मोटर्स कामगारांमधून पहिले आमदार, मंत्री, खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला.
- एकनाथ पवार, माजी अध्यक्ष, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन.
फोटो ः 33551, 33550

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com