
मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळणार; अर्जुनराम मेघवाल
पिंपरी : महाराष्ट्रातीलच नव्हे तर; जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला तत्काळ अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन रामपाल मेघवाल यांच्याकडे नुकतीच केली.
त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सांस्कृतिक विभाग सकारात्मक आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री मेघवाल यांनी दिले. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे संसदीय नेते गजानन कीर्तिकर, लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार कृपाल तुमाणे यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मेघवाल यांची मंगळवारी (ता. २८) भेट घेतली. यासंदर्भात खासदार बारणे यांनी लोकसभेत दोनवेळा प्रश्न उपस्थित केला होता.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे २०१३ पासून पत्रव्यवहार केला जात आहे. याबाबतचा प्रस्तावही राज्य सरकारने ६ डिसेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्याबाबतची फाइल मंत्रालयात तयार आहे.
‘‘मराठी भाषा ही राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा, सर्वसामान्य माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला लवकरात-लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली. मराठी भाषेस गौरवशाली व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अनेक वर्षांपासूनचे मराठी भाषांचे शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख, पुरातन साहित्य, वस्तू देखील भारतीय पुरातत्त्व विभागाकडे उपलब्ध आहेत.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा मतदारसंघ.