शून्य कचरा कार्यालय 
उपक्रमाचे उद्‍घाटन
महापालिका क क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम

शून्य कचरा कार्यालय उपक्रमाचे उद्‍घाटन महापालिका क क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम

पिंपरी, ता. ३० ः राज्यातील पहिला शून्य कचरा कार्यालय उपक्रम महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाने राबवला आहे. त्याचे उद्‍घाटन जागतिक शून्य कचरा दिनानिमित्त प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले.
‘आम्ही कचरा निर्माण करत नाही, आम्ही संपत्ती निर्माण करतो,’ या संकल्पनेवर आधारित शून्य कचरा उपक्रम आहे. त्याची आखणी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी केली आहे. त्या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. या उपक्रमात ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील ४१ महिला व ९२ पुरुष असे १४३ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाप्रमाणेच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतही शून्य कचरा उपक्रम राबविला जाईल, असे सिंह यांनी सांगितले. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनीही हा उपक्रम राबविण्याची सूचनाही त्यांनी केली. उद्‍घाटनास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपायुक्त अजय चारठाणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्वच्छ समन्वय कक्षप्रमुख सोनम देशमुख आदी उपस्थित होते. स्वच्छतेविषयी जनजागृती व टाकाऊ वस्तूंपासून विविध वस्तूंची निर्मिती करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान केला. बचत गटांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल्सला भेट देऊन सिंह यांनी माहिती घेतली. स्वयंसेवकांनी कचरा विलगीकरण विषयक जनजागृती पथनाट्य सादर केले. राजेश आगळे यांनी आभार मानले.

अशी आहे संकल्पना
‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून जेवणानंतर निर्माण होणारा ओला कचरा, वापरलेले कागद व पेन, परिसरातील झाडांचा पालापाचोळा व प्लास्टिकचे अलगीकरण केले जात आहे. प्लास्टिकची पाणी बाटली, जेवणाचा डबा, पिशवी बंद केली आहे. कर्मचारी व अधिकारी जेवणाचा डबा आणि पाणी पिण्याची बाटली धातूची वापरत आहेत.

कागदाचा खर्च भरपाई
प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून वापरलेल्या लेखनाचा आणि छपाई केलेला पेपर फाडून कचरापेटीत जायचे, या उपक्रमांतर्गत वापरलेल्या कागदांचे संकलन करून लगदा तयार करून पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यातून मिळणारे नवीन कागद हे कार्यालयासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या कागद खरेदीच्या खर्चावर बचत होईल.

प्रतिदिन ६१ किलो कचरा
क क्षेत्रीय कार्यालयात दररोज निर्माण होणारा सुका कचरा २० किलो पालापाचोळा व निर्माल्य ४१ किलो एकूण ६१ किलो दिवसाला असतो. महिन्याला सुमारे दोन टन व वर्षाला २४ टन कचरा निर्माण होत होता. त्यांचे संकलन एका वाहनातून होत असे, हा कचरा मोशी कचरा डेपो येथे दररोज वाहतूक करण्यात येत होता. आता तिथेच जिरवला जात आहे.

खत निर्मिती
शून्य कचरा कार्यालय उपक्रमामुळे सदर वाहतूक पूर्णपणे बंद होऊन आर्थिक बचत व वाहतुकीसाठी लागणारे इंधनाचे बचत होणार आहे. कार्यालयातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे. त्याचा वापर महापालिकेच्या उद्यान विभागासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानासाठी खत खरेदी करिता येणाऱ्या खर्चात बचत होऊ शकेल.

दंडात्मक कारवाई
क क्षेत्रीय कार्यालयात प्लॅस्टिकची पिशवी व बाटली घेऊन आलेल्या नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. प्रथमतः नागरिकांकडील प्लास्टिक पिशवी संकलित करून त्यांना कापडी पिशवी मोफत दिली जात आहे. एखाद्याने दुसऱ्यांदा प्लास्टिक पिशवी घेऊन कार्यालयात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
---
फोटोः 33761

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com