दोघांवर कोयत्याने वार; जिवे मारण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोघांवर कोयत्याने वार; 
जिवे मारण्याचा प्रयत्न
दोघांवर कोयत्याने वार; जिवे मारण्याचा प्रयत्न

दोघांवर कोयत्याने वार; जिवे मारण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

पिंपरी : गप्पा मारत असताना चेष्टा मस्करीत हसल्याच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवड येथे घडली. संतोष आसाराम सोनवणे (रा. पत्राशेड, अजंठानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश श्यामराव कुऱ्हाडकर (वय २०) व लव श्यामराव कुऱ्हाडकर (वय १८, दोघेही रा. पत्राशेड, अजंठानगर, चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी व आरोपी हे पत्राशेड येथे गप्पा मारत असताना चेष्टा मस्करीत फिर्यादी हसले. यावरून अंकुश याने फिर्यादीच्या तोंडावर चापट मारली. त्यावेळी तेथे फिर्यादीचे भाऊ ज्ञानेश्वर व सनी आले असता अंकुश याने घरातून त्याचा भाऊ लव याला सोबत आणले. तसेच फिर्यादी हसल्याचा राग मनात धरून दोघांनीही फिर्यादीचा भाऊ ज्ञानेश्वर व सनी यांच्या पाठीवर, हातावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ व दमदाटी केली.

जुनी सांगवीत तीन महिलांचे दागिने चोरीला
दर्शनासाठी मंदिरात गेलेल्या तीन महिलांचे दागिने चोरीला गेल्याची घटना जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मंदिरासमोर प्रसाद घेण्यासाठी रांगेत जात असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. त्याचप्रमाणे दर्शनासाठी आलेल्या ढोरे व डवरे या महिलांच्या गळ्यातीलही सोनसाखळी चोरली. अशाप्रकारे एकूण दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले.

देहूतील घरफोडीत ऐवज लंपास
गॅलरीची काच व दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने ६८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना देहूगाव येथे घडली. धनंजय दत्तू मदगे (रा. ए विंग, रॉयल कासीया हाउसिंग सोसायटी, माळीनगर, देहूगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह रायगड येथील गावी यात्रेसाठी गेले होते. दरम्यान, गॅलरीची काच तोडून दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटा घरात शिरला. घरातील रोकड, घड्याळ व सोन्याची नथ असा एकूण ६८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला.

ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी हिसकावली
ज्येष्ठ महिला पीएमपी बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांची सोन्याची बांगडी हिसकावली. हा प्रकार निगडी येथे घडला. याप्रकरणी सत्तर वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या लोकमान्य टिळक चौकातील बसथांब्यावर असताना बसमध्ये बसत होत्या. दरम्यान, चोरट्याने त्यांची पंचवीस हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरली.