शहरात पाम संडे उत्साहात हातामध्ये झावळ्या घेऊन काढली सुवार्ता फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात पाम संडे उत्साहात
हातामध्ये झावळ्या घेऊन काढली सुवार्ता फेरी
शहरात पाम संडे उत्साहात हातामध्ये झावळ्या घेऊन काढली सुवार्ता फेरी

शहरात पाम संडे उत्साहात हातामध्ये झावळ्या घेऊन काढली सुवार्ता फेरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : ‘होसान्ना... होसान्ना...’ (आमचे तारण कर), प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, अशा घोषणा देत प्रभू येशूंचा जयजयकार करीत शहरातील चर्चमध्ये झावळ्याचा रविवार म्हणजेच पाम संडे हा सण आज उत्साहात साजरा झाला. यानिमित्त ख्रिस्ती बांधवांनी हातामध्ये झावळ्या घेऊन सुवार्ता फेरी काढली.
प्रभू येशू ख्रिस्तांनी ‘यहुद्यांचा राजा’ म्हणून येरुशलेम शहरात जयोत्सवाने प्रवेश केला. तेथील समुदायाने वस्त्रे जमिनीवर टाकून हातात झावळ्या घेत होसान्नाच्या घोषणा देत येशूंचे स्वागत केले. त्या दिवसाची आठवण म्हणून सर्वत्र ख्रिस्ती बांधव झावळ्याचा रविवार साजरा करतात. हा दिवस येशूला वधस्तंभावर देण्याच्या दिवसाआधी साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील चर्चमध्ये सकाळी आठ वाजता ‘झावळ्याचा रविवार’चा संदेश दिला. त्यानंतर चर्चमधून हातात झावळ्या घेऊन दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो, असे बायबलमधील वचनांचे फलक घेऊन ख्रिस्ती बांधवांनी शहरातील प्रमुख चौक व नागरी वस्तीतून सवाद्य प्रभातफेरी काढली.
शहरातील बहुतांश चर्चचे धर्मगुरू व ख्रिस्ती बांधव हातात झावळ्याची पाने व त्यावर क्रॉस चिन्ह घेऊन, या फेरीत सहभागी झाले होते. झावळ्याच्या रविवारसंबंधी तसेच प्रभू येशू यांच्या वचनांची नागरिकांना माहिती देत प्रभू येशूंचे स्मरण केले जात होते. ‘होसान्ना, होसान्ना’, असा जयघोष यावेळी करण्यात आला. शहर व उपनगरांतील विविध चर्चतर्फे काढलेल्या सुवार्ता फेरीत धर्मगुरूंसहित अबालवृद्ध सहभागी झाले होते. या दिवसापासून ख्रिस्ती समाजाचा पवित्र सप्ताह सुरू होतो. या आठवड्यात गुड फ्रायडे, मौंदी गुरुवार, ईस्टर संडे, अंजिराचा सोमवार हे महत्त्वाचे दिवसही साजरे केले जातात, असे पास्टर पारकर यांनी सांगितले. शेवटी सामूहिक प्रार्थना झाली.