
अपंगत्वावर मात करीत, रवींद्रची यशाला गवसणी
पिंपरी, ता. २५ ः अपंगत्वावर मात करत, नवी सांगवीतील रवींद्र शरद शेजवळ या दिव्यांग विद्यार्थ्यांने बारावीत ६१ टक्के मिळवले आहेत. रवींद्रला लहानपणापासून छातीत झटके येऊ लागले. छाती वरखाली होऊ लागल्याने डॉ. संध्या भिडे यांनी त्याच्यावर उपचार केले.
मात्र, मोठा झाल्यावर त्याला बोलता येईना. त्याला ‘स्पीच थेरपी’ दिली. रंगसंगती व विविध वस्तूंचे वेगवेगळे आकार शिकवले. मात्र, पुढे त्याला कोणत्याच शाळेत प्रवेश मिळत नव्हता. त्याची आई सुनीता शेजवळ या सांगवी महापालिका शाळेत उपशिक्षिका आहेत. त्यांच्या शाळेत त्याला दाखल केले. पहिली ते आठवीपर्यंत तो उत्तीर्ण झाला. परंतु नववीमध्ये सर्व विषयांत नापास झाला. पुढे २०२० मध्ये १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीला बसला. प्रथम त्याला अपयश आले. नंतर त्याला लेखनिक देवून पुन्हा परीक्षेला बसवले. काव्य बरडिया याने लेखनिक म्हणून उत्तम काम केले. वैद्यकीय सल्ल्यानुसारच सामान्य मुलांच्या शाळेत त्याला दाखल केले होते पण इतर मुलांच्या त्रासामुळे एक वर्ष गॅप घेऊन, यावर्षी बारावीची परीक्षा दिली. लेखनिक म्हणून भूमिका रणदिवे या मुलीने काम केले.
विषयवार गुण
इंग्रजी (६४), मराठी (७४), हिंदी (७१), इतिहास (३६), राज्यशास्त्र (६३), अर्थशास्त्र (५७) असे गुण त्याला मिळाले आहेत. ६०० पैकी ३६५ गुण त्याने संपादन केले आहेत.
रवींद्रकडून विविध अभ्यासक्रम पूर्ण
रवींद्रचा बुद्ध्यांक कमी असल्याने अभ्यास करून घेताना खूपच अडचणी आल्या. उत्तराचा काही भाग त्याच्या लक्षात रहायचा, तर काही विसरून जायचा. शिवाय त्याच्या लिखाणाचा वेग कमी आहे. त्यामुळे लेखनिकाची मोलाची साथ मिळाली. त्यामुळे दहावीप्रमाणेच बारावीमध्येदेखील तो पास होईल, असा मला विश्वास होता, अशी प्रतिक्रिया वडील शरद शेजवळ यांनी व्यक्त केला. रवींद्र ‘एमएससीआयटी’ पास आहे. ग्राफिक डिसाईनचा बेसिक कोर्स केला आहे. कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटनेसचा डिप्लोमा केला आहे. एक वर्षाचा प्रिंटीगचा कोर्स केला आहे. त्याचे शिक्षण पूर्ण करून त्याला चांगली नोकरी किंवा व्यवसाय सुरू करून द्यायचा मानस आहे, असे शेजवळ यांनी सांगितले.
फोटोः 45058