‘नदी सुधार’चा होतोय ‘बिघाड’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नदी सुधार’चा होतोय ‘बिघाड’
‘नदी सुधार’चा होतोय ‘बिघाड’

‘नदी सुधार’चा होतोय ‘बिघाड’

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः शहरातील मुळा, पवना व इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यानुसार मुळा नदीच्या पुनरुज्जीवनाचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. पवना व इंद्रायणीचाही आराखडा तयार आहे. त्यामधून नदीची सुधारणा होणार आहे. मात्र, सद्यःस्थितीत नद्यांमध्ये राडारोडा, मुरूम, माती असे भराव टाकले जात आहेत. त्यामाध्यमातून पात्र अरुंद होत असून, काहींकडून ‘नदी बिघाड’ कार्यक्रम सुरू असल्याचे चित्र आहे.
पवना नदी शहराच्या मध्यातून वाहते. मामुर्डी गावाच्या हद्दीपासून दापोडीपर्यंत नदीचे पात्र शहरात आहे. सांगवी व दापोडी जवळ मुळा व पवना नदीचा संगम आहे. वाकडच्या हद्दीपासून संगमापर्यंत आणि संगमापासून बोपखेल हद्दीपर्यंत नदीचा समावेश आहे. मुळा नदीच्या एका बाजूस पुणे महापालिकेचे क्षेत्र आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांमिळून हा प्रकल्प राबविला जात आहे. तळवडे येथे इंद्रायणी नदीचा शहरात प्रवेश होतो. चऱ्होलीच्या हद्दीपर्यंत तिचे क्षेत्र महापालिकेकडे आहे. तिच्या उत्तरेला पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) निघोजे, मोई, चिंबळी, कुरुळी, केडगाव, चऱ्होली खुर्द, धोनोरे आदी ग्रामपंचायती व आळंदी नगरपरिषद हद्दीचा समावेश आहे. पवना व इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्यासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक केली आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाणार आहे. असे असताना ठिकठिकाणी नद्यांच्या पात्रात राडारोडा, माती, मुरूम टाकून नद्यांचे पात्र अरुंद केले जात असल्याचे दिसत आहे. विशेषतः पीएमआरडीए हद्दीतील गावांमध्ये काही जणांनी भराव टाकून तर काहींनी दगडी व कॉंक्रिटच्या भिंती उभारून बांधकामे केली आहेत.

आधी प्रदूषण थांबवा...
नदी पुनरुज्जीवन प्रकल्प चांगलाच आहे. पण, त्यामुळे केवळ नद्यांचे सौंदर्य वाढणार आहे. त्यांचे रुदूषण अगोदर थांबवायला हवे, अशी मागणी सिटिझन फोरम ऑफ पिंपरी-चिंचवडचे धनंजय शेडबळे, राजीव भावसार, सूर्यकांत मुथियान यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांना दिलेल्या निवेदनात फोरमने म्हटले आहे की, नदीत मिसळणारे सर्व दूषित सांडपाणी, कंपन्यांतील रसायनयुक्त पाणी रोखायला हवे. शहराच्या हद्दीबाहेरील गावे व एमआयडीसीतील नदीत मिसळणारे सांडपाणी थांबविण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. नदीचे पात्र अर्थात रुंदी व खोली नैसर्गिक पद्धतीने आहे, तशीच ठेवायला हवे. नद्यांचे केवळ सौंदर्य वाढवून उपयोग नाही, तर त्यातील जीवनचक्र सुधारणे आवश्यक असून त्या निर्मळ करायला हव्यात.

नदी सुधार प्रकल्पाबाबत सिटिझन फोरमच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. सध्याचा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प म्हणजे केवळ नद्यांचे सौंदर्य वाढविणे आहे. त्यात मिसळणारे सांडपाणी व कंपन्यांतील रसायनयुक्त सांडपाण्याचा बंदोबस्त करायला हवा. आधी त्यावर उपाययोजना करायला हवी. नदीत मिसळणाऱ्या नाल्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करायला हवी. ‘रिव्हर फ्रंट साइड डेव्हलपमेंट’ प्रकल्पाऐवजी ‘रिव्हर डेव्हलप’ करून त्यातील जैवविविधता जपायला प्राधान्य द्यायला हवे.
- सूर्यकांत मुथियान, सदस्य, सिटीझन फोरम ऑफ पिंपरी-चिंचवड

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा नदीच्या टप्पा एकचे काम सुरू आहे. पवना व इंद्रायणी नदीबाबतचा विकास आराखडा सरकारकडे पाठविला आहे. नद्यांमध्ये भराव टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक कार्यरत आहे. आतापर्यंत १६ लाख रुपये दंड वसूल केला असून दहा जणांवर फौजदारी कारवाई केली आहे. सध्या इंद्रायणी नदीलगत सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदाई करताना निघणारी माती बाजूला टाकली जाते. वाहिनी टाकून झाल्यानंतर पुन्हा सपाटीकरण केले जात आहे.
- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका