गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

चिखली खून प्रकरणातील
आरोपीला साताऱ्यातून अटक
चिखली : किरकोळ वादातून एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून चिखली येथे हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी (ता. २२) घडली. या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखा एकच्या पथकाने सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे.
सौरभ ऊर्फ सोन्या बाळासाहेब पानसरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच, एका अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कृष्णा ऊर्फ सोन्या तापकीर (वय २०), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दोन पथके तयार केली. या पथकांनी चिखली, पुनावळे, मोईगाव, यवत, सुपा या भागात आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी पानसरे हा सातारा जिल्ह्यातील सरताळा या गावामध्ये लपून बसला आहे. त्यानुसार, पोलिसांनी तेथे सापळा लावून, आरोपीसह एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
--------------

पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक
चिंचवड ः पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने चिंचवड परिसरात ही कारवाई केली.
सुनील बाळासाहेब खेंगरे (वय ३८, रा. चिंचवडेनगर, चिंचवड), अभिजित अशोक घेवारे (वय ३५, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुन्हे शाखेला पिस्तूल शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार चिंचवड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी चिंचवडेनगर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख २० हजार ६०० रुपये किमतीचे तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
भोसरी ः भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्याने सायकलस्वाराचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. २४) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला.
महादेव गुंडाप्पा संगापुरे (वय ७५, रा. भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा बबन महादेव संगापुरे (वय ४५, रा.भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रकचालक रमजान यासीन शेख (वय ३३, रा. निगडी) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न

चिखल : एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. हा प्रकार बुधवारी (ता. २४) चिखली येथील जाधववाडी परिसरात उघडकीस आला.
या प्रकरणी उमेश लक्ष्मण लमखेडे (वय ३७, रा. चऱ्होली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. टेस्टर व दगडाच्या साहाय्याने मशिन उचकटण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाहतूक पोलिसांशी अरेरावी
भोसरी : दंडाची पावती केल्याच्या रागातून एका तरुणाने वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून येत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच, पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. हा प्रकार बुधवारी (ता. २४) नाशिक फाटा येथे घडला.
या प्रकरणी पोलिस नाईक बाबासाहेब पाखरे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अश्वदिप पोपटलाल तारळकर (वय २४, रा.भोसरी) याच्यासह अन्य एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी नाशिक फाटा येथे वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी दुचाकीवरून निघालेल्या आरोपींनी वाहतुकीचा नियम मोडला. त्यामुळे फिर्यादी यांनी दंड आकारला. तुम्ही पावती का फाडली, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांच्याशी हुज्जत घातली.
तसेच, पोलिस निरीक्षकाच्या अंगावर धावून गेले. आरोपींना कारवाईसाठी पोलिस ठाण्यात नेले असता, त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत मोबाईलवर चित्रीकरण करण्यास सुरवात केली. तसेच, ती चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

हिंजवडीत महिलेची फसवणूक
हिंजवडी : समाज माध्यमांवर सेलिब्रेटींना फॉलो केल्यास ३० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी मिळून महिलेची तब्बल पावणे नऊ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार ९ मे २०२३ रोजी हिंजवडी येथे उघडकीस आला.
याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेलिग्राम युजर्स आनाया शर्मा, यांच्या समाज माध्यमावरील खात्याला फॉलो करण्यास सांगितले. तसेच, गुंतवणुकीवर ३० टक्के जास्त फायदा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार, फिर्यादी यांनी आठ लाख ७५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर कोणताही नफा परत न करता, आरोपींनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक
चिंचवड ः गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात बुधवारी (ता. २४) ही कारवाई करण्यात आली.
किरण रमेश गालफाटे (वय २२), रोहन जयदीप चव्हाण (वय १९, दोघे रा. मंगळवार पेठ, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई उमेश मोहिते यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वाल्हेकरवाडी परिसरात आले असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे, असा एकूण २४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक
पिंपरी : गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी ही कारवाई केली.
सवाराम रताराम चौधरी (वय ४२, रा. चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस शिपाई रणधीर रमेश माने यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अवैध गुटखा विक्री करीत असून, त्याने एका गोदामात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गोदामावर छापा मारुन आरोपीला अटक केली. तसेच, एक लाख ५३ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला.

तळेगावात कोयत्याची दहशत
तळेगाव : कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. हा प्रकार बुधवारी (ता. २४) दुपारी चारच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील गोसावीवस्ती परिसरात घडला.
किटक ऊर्फ जय भालेराव (वय १९, रा. तळेगाव दाभाडे), आर्यन ऊर्फ छोटा बांडी अनिल गरुड (वय २०), विशाल गुंजाळ (वय २०) यांना अटक केली आहे. तर, अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे.

मृत्यूची अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा
दिघी : समाज माध्यमांवर महिलेच्या मृत्यूची अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ जानेवारी २०२३ ते २३ मे २०२३ या कालावधीत दिघी येथे घडला. या प्रकरणी महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चेतन रोहीत सिंग (रा. विश्रांतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी महिलेबाबत ‘व्हॉटसअप’ व ‘इन्स्टाग्राम’वर अश्‍लील कमेंट केल्या. तसेच, ‘इन्स्टाग्राम’वर महिलेच्या छायाचित्राला श्रद्धांजली वाहत, त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवली.

हिंजवडीत तरुणाला हातोड्याने मारहाण
हिंजवडी : पूर्ववैमनस्यातून तरुणाला हातोड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (ता. २४) सकाळी हिंजवडी येथील एका बांधकाम साईटवर झाली. महम्मस युसूफ पठाण (वय २८), असे जखमीचे नाव आहे.
या प्रकरणी सुरेंदर नागेंदर पांडे (३२, रा. काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल कुमार निशाद (वय २७, रा. हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी निशाद फिर्यादी यांचा कामगार पठाण आणि आरोपी हिंजवडी येथील अटलांटा बांधकाम साईटवर काम करतात. दरम्यान, त्यांच्यात झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून, आरोपीने पठाण याच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून, त्यांना गंभीर जखमी केले.