
पुण्यातील पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मत
पिंपरी, ता. ८ : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आम्हाला सहकार्य करावे, अशीच आमची विनंती राहील, असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज व्यक्त केले. पिंपरी येथे मेळाव्यासाठी थोरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पुण्यातील पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढेल, या अजित पवार यांच्या विधानाबद्दल थोरात म्हणाले, ‘‘अशाप्रकारची चर्चा होत राहते. अगदी महाविकास आघाडीच्या बैठकीतही हा मुद्दा येईल. मात्र, पारंपरिक पद्धतीने जो पक्ष निवडणूक लढत आलाय, त्याच पक्षाने ही निवडणूक लढवावी. यावर आम्ही ठाम राहू.’’
भाजपचे नीतेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत थोरात म्हणाले, ‘‘राजकारणाचा स्तर इतका खालावला आहे, की आम्ही टीव्ही पाहणं बंद केलंय. कोणीतरी काही बोलावं आणि ते संपूर्ण जनतेने पाहावं, हे योग्य नाही. काहीजण बोलण्याबाबत आचारसंहिता पाळत नसतील तर; किमान चॅनेलने तरी आचारसंहिता बनवावी. अशा बातम्या दाखवू नयेत. संसदेतील माझ्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीतील अशी खालची पातळी मी कधी पाहिली नव्हती. महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे.’’