
स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण सोहळा उद्या
पिंपरी, ता. २६ ः स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त त्यांच्या नावे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा आणि मंडळाच्या चाळीसाव्या वर्धापनदिन कार्यक्रम रविवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहा वाजता प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार आहे. अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळाचे सदस्य साहित्यिक डॉ. रमेश पांडव यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय एकात्मतेची बीजे पेरणाऱ्या मणिपूर येथील ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ला तर, राज्यस्तरीय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील ‘पूर्वांचल विकास प्रकल्प छात्रवास’ यांना प्रदान केला जाणार आहे. अनुक्रमे एक लाख व ५१ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर यांनी दिली.