
गुन्हे वृत्त
सार्वजनिक ठिकाणी भांडण;
पिंपरीत आठ जणांवर गुन्हा
पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी भांडण करणाऱ्या आठ जणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) दुपारी साडेतीनच्या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. संकेत संतोष उबाळे (वय २०), किरण योगेश वाघ (वय २२), सचिन संजय तहसीलदार (वय ३०), राहुल संजय तहसीलदार (वय २५) आणि चार महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाणे अंमलदार पंडित धुळगंडे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी संपत्तीच्या कारणावरून एकमेकांसोबत सार्वजनिक रस्त्यावर भांडण करीत होते. आरोपींनी आरडाओरडा, शिवीगाळ केल्याने सार्वजनिक शांततेचा भंग झाला. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.
दुसऱ्याच्या नावावर मागवले मोबाईल
बावधन : ग्राहकाचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून कंपनीतील एकाने अमेरिकेतील दोन मित्रांसाठी साडेआठ लाखांचे १४ मोबाईल ऑर्डर केले. हा प्रकार १५ ते १८ एप्रिल या कालावधीत बावधन येथे घडला. अनिल रवींद्र गाडे (वय ४३, रा. पाषाण) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश विजय वनवारी (वय २६, रा. पिंपळे सौदागर) यांच्यासह अमेरिकेतील साथीदार विल्यम कोल आणि एक आज्ञात इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी योगेश वनवारी हा फिर्यादी यांच्या कंपनीत काम करीत होता. योगेश याने फिर्यादी यांच्या कंपनीचे ग्राहक कॅथी व कॅरी थॉमसन यांचे ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ वापरून बेकायदा अमेरिकेतील मित्रांच्या पत्त्यावर १४ मोबाईल ऑर्डर केले. त्यानंतर योगेश याचे अमेरिकेतील दोन साथीदार यांनी ते मोबाईलची विक्री करून फिर्यादी यांच्या कंपनीची साडेआठ लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी योगेश याला अटक केली आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.
हॉटेलला रेटिंग देण्याच्या टास्कद्वारे फसवले
चिंचवड : हॉटेलला रेटिंग देण्याचा टास्क तरुणाची दहा लाख ९५ हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १० ते १७ म या कालावधीत केशवनगर, चिंचवड येथे घडला. गणेश मुकुंद अमृतकर (२८, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेलिग्राम चॅनल धारक आणि अन्य अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सोशल मीडियावरून फिर्यादी यांच्याशी संवाद साधला. एका वेबसाईटद्वारे कमिशन देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना ‘हॉटेलला रेटिंग’ देण्याचे टास्क दिले. ‘हॉटेलला रेटिंग’ देण्याचे टास्क देऊन त्यावर अधिक परतावा देण्याचे आमिष आरोपींनी फिर्यादी यांना दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेत त्यांची दहा लाख ९५ हजार ८२ रुपयांची फसवणूक करण्यात आली. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.
दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
दिघी : भरधाव वेगातील दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना देहू फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. पवन सुनील सोनसळे (वय २७, रा. मोरेवस्ती चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ठाणे अंमलदार संदीप कांबळे यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवन दुचाकीवरून डुडुळगाव मोशी येथून देहू फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी घसरून ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मिक्सरला धडकली. या अपघातात पवन गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.
महाळुंगेत पावणे चौदा लाखांचा ऐवज चोरीस
महाळुंगे ः कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने कंपनीतून वेगवेगळ्या धातूंचे तेरा लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचे पार्ट चोरून नेले. ही घटना २१ मे रोजी महाळुंगे येथील बोरा मोबिलिटी एलएलपी या कंपनीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी कामगाराला अटक केली आहे.
अतिराज ऊर्फ बबलू राम मधाळे (वय ३२, रा. लातूर) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी अभय यादवराव बनसोडे
(२८, रा. कोयनानगर, ता. हवेली) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मधाळे फिर्यादी यांच्या कंपनीत काम करीत होता. त्याने कंपनीतून टीटानियम, ॲल्युमिनिअम, क्रोमियम, झिरकॉनी आदी धातूंचे १३ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचे १३१ पार्ट चोरून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.
काळेवाडीत तरुणावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला
काळेवाडी : पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला हा प्रकार गुरुवारी (ता. २५) मध्यरात्री काळेवाडी येथे घडला आहे. या प्रकरणी मंदार सुनील कुशे (वय २५, रा.गिरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पाच ते सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी खाण्याचे पार्सल घेण्यासाठी जात होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संघर्ष चंदनशिवे याच्या वडिलांना आरोपींनी विनाकारण मारहाण केली. फिर्यादी हे संघर्ष याचा मित्र असल्याचा संशय आल्याने त्यांनी फिर्यादी यांना अडवले व आज याला सोडायचा नाही, असे म्हणत कोयत्याने डोक्यावर मारत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कोयते फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आळंदीत अल्पवयीन मुलीवर लैगींक अत्याचार
दिघी : अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जानेवारी ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान आळंदी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमित अंकुश इंगोले (वय २१ रा. दिघी) यास अटक करण्यात आली आहे. फिर्यादीची मुलगी सतरा वर्षांची आहे. याबाबत माहिती असताना देखील आरोपीने तिच्यावर दोनवेळा लैगिंक अत्याचार केले. मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
ज्येष्ठ महिलेला मारहाण करीत दिली धमकी
पिंपरी : न्यायालयात वाद सुरू असतानाही घरावर ताबा घेण्यासाठी ज्येष्ठ महिलेला मारहाण केली. तिच्या नातवाला जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार बुधवारी (ता. २४) सकाळी पिंपरीतील नेहरूनगर येथे घडला आहे. या प्रकरणी ७२ वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन संजय तहसीलदार (वय ३३), राहुल संजय तहसीलदार (वय ३०, दोघे रा. पिंपरी) यांच्यासह अन्य दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी यांच्यात घराच्या मालकी हक्कावरून न्यायालयात वाद सुरू आहे. मात्र, तरीही आरोपीने घराची कौले काढण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी त्यांना हटकले असता आरोपींनी त्यांचा हात पिरगळला. तसेच, कौलाने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या नातवाला देखील मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.