डीपी बॉक्सला हात लागून मुलगी जखमी;
महावितरण अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

डीपी बॉक्सला हात लागून मुलगी जखमी; महावितरण अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी ः मैत्रिणीसोबत खेळत असताना उघड्या डीपीला हात लागल्याने आठ वर्षीय मुलगी गंभीर भाजून जखमी झाली. पिंपळे सौदागर येथे १६ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी महावितरणचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. डीपीला संरक्षण कुंपण नसल्याने अपघात घडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद विजयकुमार उमर्जीकर (वय ३२, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी मैत्रिणीसोबत खेळत असताना पिंपळे सौदागर येथील जगताप कॉलनी येथील सार्वजनिक शौचालयाजवळील इलेक्ट्रिक डीपीच्या कंपाउंडमध्ये गेली. तिचा हात उघड्या डीपीला लागला. त्यामध्ये ती गंभीर भाजली होती. महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डीपीला संरक्षण कुंपण न घातल्याने व डीपी व्यवस्थित बंद न केल्याने हा अपघात घडल्याचा आरोप आहे.

वायसीएम परिसरात मृत अर्भक
पिंपरी ः यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय परिसरातील कचरा कुंडीजवळ मृत अर्भक सापडले. याप्रकरणी सफाई कामगार सुशील दामोदर भालेराव यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे. अर्भकाच्या जन्माची लपवणूक व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अर्भक फेकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नवलाख उंब्रेत ट्रेलर बॅटऱ्यांची चोरी
पिंपरी ः नवलाख उंब्रे येथील जनरल मोटर्स कंपनीबाहेर उभ्या ट्रेलरच्या चार बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी जग्गू प्रभू जाधव (वय २०, रा. माळवाडी, ता. मावळ) याला अटक केली आहे. महारुद्र मल्लिकार्जुन कुरे (वय २७, रा. वराळे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

आळंदीत ‘एटीएम’ बदलून फसवणूक
पिंपरी ः बॅंक खात्यावरील शिल्लक तपासण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये गेलेल्या ज्येष्ठाकडील एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांची ६० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार आळंदी-मरकळ रस्त्यावर घडला. सुरेश बागड यांनी फिर्याद दिली आहे. अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आहे.

शिरगावमध्ये सट्टा; चौघांना अटक
पिंपरी ः क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणारे दुर्गेश पारीख (वय ३५), शिवदान सिंग (वय ३१), सावरिया प्रजापती (वय २१), ओमप्रकाश चौधरी (वय ३०, सर्व रा. लोढा बेलमोंडो सोसायटी, ता. मावळ. मूळ रा. राजस्थान) यांना अटक केली आहे. दरोडा विरोधी पथकाने शिरगावमध्ये ही कारवाई केली.

चाकणमध्ये तोतयाने गंडवले
चाकण ः गांजाची तपासणी सुरू असल्याचे सांगून तोतयाने मजुराच्या गळ्यातील एक लाख ८२ हजारांची सोनसाखळी चोरली. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे हा प्रकार घडला. अण्णा नाना पवार (वय ५२, रा. नेरेदत्तवाडी, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस असल्याचा बहाणा करून लुबाडणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे.

बावधनला पाच लाखांची फसवणूक
पिंपरी ः बँकेचा प्रतिनिधी बोलत असल्याचे भासवून एकाने दाम्पत्याला मेसेजद्वारे लिंक पाठवली. कोणतीही खातरजमा न करता ती क्लिक करताना त्यांच्या बॅंक खात्यातून तब्बल चार लाख ७८ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार बावधनमध्ये घडला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

जमीन विक्रीच्या बहाण्याने फसवणूक
पिंपरी ः ओळखीच्या लोकांनी महिलेच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन जमीन विकून त्याचा चांगला मोबदला देण्याच्या बहाण्याने ६५ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार चाकण येथील फेडरल बँकेत घडला. विशाल राऊत, माणिक राऊत यांच्यासह एक महिला, रोलिंग फॉरवर्ड इस्टेट यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक
पिंपरी ः बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाने उत्तरसिंग रामकुमार राठोड (वय ४८, भोसे, ता. खेड), कल्याणसिंग तेजस राठोड (वय २१, रा. तळेगाव दाभाडे), विकी मुरली राजपूत (वय २५, रा. भोसे, ता. खेड) यांना अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com