पिंपरी भाजपची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी भाजपची बैठक
पिंपरी भाजपची बैठक

पिंपरी भाजपची बैठक

sakal_logo
By

भाजपचे उद्यापासून शहरात
‘विशेष जनसंपर्क अभियान’

आमदार लांडगे यांची माहिती; चिंचवडला बैठक

पिंपरी, ता. २८ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला मंगळवारी (ता. ३०) नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशभरात ‘विशेष जनसंपर्क अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातही ३० जूनपर्यंत अभियान राबविण्यात येणार असून जिल्हा, मंडळ, शक्तीकेंद्र आणि बूथ पातळीवर विविध कार्यक्रम व उपक्रम होणार आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहर कार्यकारिणीची बैठक चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झाली. त्याबाबत आमदार लांडगे यांनी माहिती दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक मोर्चे बांधणीवर भर दिला आहे. पक्षाच्या सत्ताकाळातच शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. यात शास्तीकर माफी, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्प, कचरा समस्या सोडवण्यासाठी वेस्ट टू एनर्जी, मोशी येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक तसेच क्रीडा विषयक प्रकल्प आदींचा समावेश आहे. शहराचा समतोल विकास केला आहे. समाविष्ट गावांना २० वर्षे विकासापासून वंचित राहावे लागेल. पण, भाजप काळात या गावांत खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळाली, असा दावाही लांडगे यांनी केला.
आमदार आश्विनी जगताप यांचा पोटनिवडणुकीतील विजय, जिल्हा प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल वर्षा डहाळे आणि विधान परिषद आमदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल उमा खापरे यांचा सन्मान केला. दिवंगत खासदार गिरीश बापट, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी महापौर उषा ढोरे, माजी खासदार अमर साबळे आदी उपस्थित होते. अमोल थोरात यांनी प्रास्ताविक केले. राजू दुर्गे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश जवळकर यांनी आभार मानले.

बैठकीतील ठराव मंजूर
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतींचा लढा बारा वर्षांनंतर यशस्वी झाला. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी कायमस्वरुपी उठवली. यासह आंद्रा प्रकल्पातील १०० एमएलडी पाणी शहरात दाखल झाले. त्यापैकी ५० एमएलडी पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला. शहराच्या स्थापनेपासून म्हणजे ५० वर्षांत शहरासाठी पहिला जलस्त्रोत निर्माण झाला. आमदार महेश लांडगे आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सकारात्मक भूमिकेतून भाजपच्या सत्ताकाळात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले. या अनुषंगाने कार्यसमिती बैठकीत आमदार लांडगे यांच्या अभिनंदनाचा ठराव चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांनी मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.