वाहनचालकांच्या बेशिस्तीने कोंडी नित्याचीच

वाहनचालकांच्या बेशिस्तीने कोंडी नित्याचीच

पिंपरी, ता. २९ : आकुर्डी-थरमॅक्स चौक-साने चौक-चिखलीकडे जाणारा रस्ता हा वर्दळीचा आहे. शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, कामावर जाणाऱ्या कामगारांची येथे गर्दी असते. अनेकांची वाहने रस्त्यावरच उभी केलेली असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी होते. या सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत.
या परिसरात व्यावसायिक दुकाने, शाळा, भाजी मंडई, बसस्थानक तसेच खाऊ गल्ली असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच विद्यार्थी, नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगसंबंधी फलक लावण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत व्हावी, वाहनधारकांना शिस्त लागावी, हा त्यामागील हेतू आहे. परंतु, परिसरातील दुचाकीचालक बेशिस्तपणे वाहने रस्त्याचाकडेला उभी करीत असून, येथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे.
नागरिकांनी वाहने पार्किंग करताना कोणालाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने लावायला हवी. मात्र, अधिकृत पार्किंगची सुविधा नसल्याने नाइलाजास्तव वाहन चालकांना रस्त्यावरच गाड्या लावाव्या लागतात. त्यामुळे सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेने या परिसरात पार्किंगसाठी जागा निश्चित करावे व पार्किंगमध्ये व्यवसाय थाटणाऱ्या व रस्त्यावर हातगाड्या लावून अडथळा निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत

पार्किंग शिवाय इमारती; महापालिकेची ‘चुप्पी’
या परिसरात मुख्य रस्त्याला दोन्ही बाजूला व्यापारी गाळे तसेच निवासी गाळ्यांनासुद्धा व्यावसायिक गाळ्याचा स्वरूप देण्यात आले आहे. परंतु बहुसंख्य इमारतींना ग्राहकांसाठी पार्किंगची सुविधा नाही. पार्किंगमध्येच बहुतेकांनी व्यवसाय थाटल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता पार्किंग शिवाय इमारत बांधता येत नाही, असा नियम असताना सुद्धा या इमारती मालकावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही किंवा महापालिका तसे करण्याच्या मनःस्थितीत नाही. याचे कारण गुलदस्त्यात आहे.

पदपथावरून चालणेही अवघड
आकुर्डी चिखली रस्त्यावर सम-विषम अशी पार्किंगची सोय असूनही, अनेक बेशिस्त वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी बिनदिक्कत उभ्या करतात. काही वाहनचालक पदपथावर गाड्या उभ्या करतात. त्यामुळे नागरिकांना पदपथांवरून चालणे कठीण होते. पदपथांवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणेही अवघड झाले आहे.

‘‘आकुर्डी-चिखली रस्त्यावर कस्तुरी मार्केट ते साने चौक या भागात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर दुचाकी असेल तर उचलून नेली जात आहे. वाहतूक पोलिसांचे कार्यालय तळवडे भागात आहे. फक्त दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. लोकांना कारवाईबाबत माहिती नाही. फलक लावले नाहीत. किमान आठ दिवस अगोदर प्रबोधन करणे गरजेचे आहे.
- शिवानंद चौगुले, सामाजिक कार्यकर्ते, महात्मा फुलेनगर

‘‘महापालिकेने अनेक ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावले आहेत. तरीदेखील काही वाहनचालक बेशिस्तपणे आपली वाहने या ठिकाणी उभी करतात. वाहतूक पोलिसांकडून या रस्त्यावर सध्या कारवाई सुरू आहे. सम-विषम पार्किंगचे नियोजन करावे. येथे ठोस उपाययोजना करावयास हवी. महापालिकेने व वाहतूक पोलिसांनी पांढरे पट्टे ओढून नागरिकांना प्रबोधन केले पाहिजे. सूचना दिल्या पाहिजेत. त्यानंतर कारवाई करावी.’’
- वैभव छाजेड, माजी उपाध्यक्ष, वाहतूकसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, चिखली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com