
कविसंमेलन, गीतगायन अन् सन्मान
पिंपरी, ता. २९ ः कवी संमेलन, पुरस्कार वितरण आणि प्रतिमा पूजन अशा विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. निमित्त होते, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक संस्था, संघटनांतर्फे आयोजित विविध कार्यक्रमांचे.
काव्यात्मा साहित्य परिषदेतर्फे पिंपळे गुरव येथे आयोजित कवी संमेलनात विविध रचना सादर झाल्या. गझलकार प्रदीप गांधलीकर अध्यक्षस्थानी होते. मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, घनोबा ग्रुप लिमिटेडचे अध्यक्ष सदानंद पाटील, वसुंधरा पर्यावरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष तानाजी एकोंडे, काव्यात्मा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आत्माराम हारे उपस्थित होते. कष्टकरी कामगार युवराज खांडेकर यांना श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक कार्यकर्त्या राजलक्ष्मी हेगडे यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित केले. विष्णू वाघ, संभाजी रणसिंग, फुलवती जगताप, डॉ. पी. एस. आगरवाल, मंगेश हारे, श्यामराव सरकाळे, नंदकुमार कांबळे, जयश्री गुमास्ते, उमेंद्र बिसेन, गजानन उफाडे, दत्तू ठोकळे, आनंद गायकवाड, प्रज्ञा तगलपल्लेवार, हेमंत जोशी आदींनी कविता सादर केल्या. सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले. संजय साळुंके यांनी आभार मानले.
पिंपळे सौदागर येथे अभिवादन
पिंपळे सौदागर येथील राजवीर पॅलेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. विठ्ठल देवगावकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विलास जोशी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी सावरकरांचे विचार, त्यांचे कार्य आणि आजची सामाजिक परिस्थिती याविषयी मनोगत व्यक्त केले. तृप्ती जोशी आणि आदिती जोशी यांनी ‘जयोस्तुते जयोस्तुते श्री महनमंगले’ हे गीत सादर केले. विजय देवगावकर, शशिकांत कुलकर्णी, श्रीनिवास पारखी, अनिल कुलकर्णी, जयवंत चौधरी, शंतनू जोशी, अभिजित जोशी, राजन धोंगडे, दिनेश कुलकर्णी, विवेकानंद थत्ते, राजेंद्र देशमुख, वासंती जोशी, संगीता देवगावकर आदी उपस्थित होते.