
अतिक्रमणे, बेशिस्तीने वाहतुकीचा बट्ट्याबोळ
पिंपरी, ता. २९ ः औंध-रावेत-किवळे बीआरटी मार्गाचे सुशोभिकरण महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत करण्यात आले. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस शोभेची झाडे-झुडपे लावून पदपथ व सायकल मार्गाची उभारणी केली. वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी बीआरटी बस मार्ग, मुख्य रस्ता, सेवा रस्ता अशी विभागणी केली. यातील सांगवी फाटा ते जगताप डेअरी चौकापर्यंत स्मार्ट सिटीअंतर्गत आणि जगताप डेअरी चौकापासून किवळेतील मुकाई चौकापर्यंतचा रस्ता महापालिका बीआरटीएस विभागाने केला आहे. याच मार्गाच्या सेवा रस्त्यावर पथारीवाले, वाहनांतून भाजीपाला, फळे विविध वस्तू विकणारे थांबलेले असतात. त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला असल्याने अन्य वाहनांसाठी रस्ता अरुंद ठरतो. शिवाय भुयारी मार्गांच्या परिसरातही भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या असतात. त्यातून मार्ग काढताना व पुढे जाण्यासाठी बेशिस्त वाहनचालक विशेषतः दुचाकीस्वार वाट मिळेल, तिथून दुचाकी दामटतात. परिणामी, वाहतूक कोंडीत भर पडते, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
काय करायला हवे
- रस्त्यावरील मंडई हटवून नियोजित जागेत स्थलांतर करावे
- सब-वेमुळे रस्ता अरुंद झाल्याने अतिक्रमणे हटवावीत
- ट्रॅव्हल्स, विरुद्ध दिशेने येणारे व रस्त्यात उभ्या वाहनांवर कारवाई व्हावी
- मोठी वाहने सब-वेतून जाऊ नये यासाठी लोखंडी अडथळे उभारावेत
- सेवा रस्ता नो पार्किंग झोन करून त्याबाबतचे फलक लावावेत
दृष्टिक्षेपात औंध-रावेत-किवळे मार्ग
लांबी ः १४ किलोमीटर
रुंदी ः ४५ मीटर
उड्डाणपूल ः ४
भुयारी मार्ग ः ३
ग्रेड सेपरेटर ः ३
(बातमीत बातमी वापरावी)
सब-वेमध्ये वाहतुकीचा खोळंबा
वाकड : विरुद्ध दिशेने येणारे वाहनचालक, भर रस्त्यातच थाटलेली भाजी मंडई, पथारी व्यवसायिक अन् रस्त्यावर पार्क केलेली मोठी वाहने यामुळे काळेवाडी फाटा ते डांगे चौक बीआरटी मार्गातील सब-वेमध्ये दररोज सायंकाळी पाच ते रात्री नऊ दरम्यान वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. रविवारी (ता. २८) काळेवाडी फाटा ते कस्पटे वस्ती रस्त्यावर एकामागे एक पन्नासहून अधिक ट्रॅव्हल्स बस उभ्या होत्या. संपूर्ण रस्ता त्यांनी काबीज केला होता. कावेरीनगर सब-वेमुळे निमुळता झालेल्या १६ नंबर बसथांबा येथील सेवारस्त्यावर वाहनांची कोंडी होती. पादचारी नागरिकांचीही गर्दी होती. कावेरीनगर, वेणूनगर पोलिस वसाहत रस्त्यावर वाहनांच्या रांगा होत्या.
रस्त्यावर मंडई, वाहने आणि हातगाड्या
महापालिकेची भाजी मंडई असतानाही सोळा नंबर चौकात मुख्य रस्त्यावरच भाजी मंडई भरते. सुमारे शंभर एक हातगाड्या रस्त्यावर असतात. महापालिकेचा गाळा घेऊनही अनेकांनी रस्त्यावर पुन्हा बस्थान मांडले आहे. मोठी वाहने रस्त्यात लावून काहींची खरेदी सुरू असते. सर्रासपणे विरुद्ध दिशेने येणारी वाहने कोंडीत भर घालतात. गुजरनगर सब-वेमध्ये तुरळक गर्दी होती. डांगे चौकात रविवार आठवडे बाजार असल्याने कोंडीत आणखी भर पडते.
‘‘औंध-रावेत रस्त्यावरील १६ नंबर बस थांब्याकडून जायचे म्हटल्यास अंगावर काटा येतो. हा रस्ता भाजी विक्रेत्यांनी व्यापला आहे. कोणी कुठूनही कसेही वाहने चालवितात. विरुद्ध दिशेने येणाऱ्यावर व बेकायदा पार्किंग करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी व त्यात सातत्य ठेवावे.’’
- महावीर गांधी, वाहनचालक
‘‘औंध-रावेत रस्त्यावर नियमितपणे कारवाई सुरू आहे. ‘नो पार्किंग’ करावे, फलक लावावेत व अन्य उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला असून पाठपुरावा सुरू आहे. अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच हातगाड्या गायब होतात. कारवाईनंतरही परस्थिती जैसे-थे असते.’’
- सुनील पिंजन, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग
‘‘औंध-रावेत बीआरटी रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे अधिकार ‘ड’ व ‘ग’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासंदर्भात त्यांना कळविले आहे. पण, कारवाईनंतरही विक्रेते पुन्हा येऊन रस्त्यातच हातगाड्या लावून अतिक्रमणे करताना दिसतात.’’
- प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता, बीआरटीएस विभाग, महापालिका
(बातमीत बातमी वापरावी)
वाहनातून वस्तू विक्रेत्यांमुळे अडथळे
जुनी सांगवी ः सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपूल ते पिंपळे निलख येथील रक्षक चौक या सांगवी-किवळे बीआरटी रस्त्याच्या कडेला फेरीवाले, भाजी व फळ विक्रेते थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. येथील दोन्ही बाजूस सायकल ट्रॅक व पदपथाचे काम सुरू आहे. पूर्वीचा मोठा रस्ता या कामांमुळे अरुंद झाला आहे. यातच रस्त्याकडेला होणारी भाजी विक्री, विविध फळे वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे कोंडीत भर पडत आहे. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशी सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून त्यावर महापालिका व वाहतूक पोलिस यांनी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
‘‘महापालिकेकडून औंध-रावेत रस्त्यावर दोन्ही बाजूंनी पदपथ व सायकल ट्रॅकचे काम केले आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत सध्याचा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे कोंडी होत आहे.’’
- वसंत तांबे, नागरिक.
‘‘वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. महापालिका अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिस यांच्यामार्फत सर्वच भागात नियमितपणे कारवाई केली जात आहे.’’
- प्रसाद गोकुळे, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग