डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू; एकजण जखमी

डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू; एकजण जखमी

पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला. तर, दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडगाव रोड, आळंदी येथे घडली. तात्याभाऊ रावसाहेब धोत्रे (वय ७६, रा. मरकळ रोड, आळंदी) असे मृत्यू झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. तर, दुचाकीचालक परमेश्वर बाळासाहेब धोत्रे (५३, रा. मरकळ रोड, आळंदी. मूळ रा. गेवराई, बीड) जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोपान लक्ष्मण काळे (वय ५९, रा. कोयाळी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
पिंपरी : भरधाव वेगातील आलिशान कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २७) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.
याप्रकरणी महिलेच्या पतीने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची पत्नी आणि मुलाला घेऊन दुचाकीवरून जात होते. सोमाटणे फाटा रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली. तर, फिर्यादी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता कारचालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

घातक शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना अटक
पिंपरी : घातक शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस, असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. रविवारी (ता. २८) दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दिलीप प्रेमनारायण तिवारी (वय ४२, रा. कोल्हापूर, मूळ रा. उत्तर प्रदेश), चंदन कुमार ऊर्फ बैजूराय चंदेशवर राय (वय १९, रा. कोल्हापूर, मूळ रा. बिहार), सुगनकुमार जवाहिर राय (वय १८, रा. कोल्हापूर, मूळ रा. बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार आशिष गोपी यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी रोड येथील ५२ खोल्यांसमोरील मोकळ्या मैदानात तिघेजण संशयितरीत्या थांबले होते. त्यांच्याकडे शस्त्र असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आणि ३० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा असा शस्त्रसाठा मिळून आला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

तीन तलाक पद्धतीने घटस्फोट; पाचजणांवर गुन्हा
पिंपरी : माहेराहून पैसे न आणल्याने सासरच्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, पतीने विवाहितेला तीन तलाक पद्धतीने घटस्फोट देऊन माहेरी हाकलून दिले. हा प्रकार २९ एप्रिल २०१८ ते १३ मे २०२३ या कालावधीत पिंपरी येथे घडला. अकीब आसिफ खान (वय ३१), आसिफ अब्दुल्ला खान (वय ६२) आणि तीन महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विवाहितेकडे माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. दरम्यान, विवाहितेने पैसे न दिल्याने आरोपींनी त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच, आरोपी पतीने विवाहितेसमोर तीन वेळा ‘तलाक’ बोलून त्यांना माहेरी हाकलून दिले. त्यानंतर फिर्यादी यांच्या संमतीशिवाय दुसरे लग्न केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

प्रवासी महिलेची सोन्याची बांगडी चोरली
पिंपरी : पीएमपी बसमधून प्रवास करीत असलेल्या महिलेची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना २४ मे रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास मधुकर पवळे उड्डाण पुलाजवळील बीआरटी बस स्टॉप येथे घडली. याप्रकरणी महिलेने निगडी पोलिस
ठाण्यात रविवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २४ मे रोजी दुपारी पीएमपीएल बसमधून प्रवास करीत होत्या. दरम्यान, मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळ बीआरटी बस थांबा येथे बसमधून उतरत असताना त्यांच्या हातातील ५६ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गंधर्वनगरी येथे सव्वा लाखाची घरफोडी
पिंपरी : मोशी येथील गंधर्वनगरीमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून एक लाख २३ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली. सागर नामदेव गडसिंग (वय २४, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर शनिवारी रात्री आठच्या सुमारास कुलूप लावून बंद होते. दरम्यान, रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मधील लाकडी कपाटाच्या लॉकर मधून एक लाख २३ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. फिर्यादी रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

दारू पिण्याच्या वादातून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण
पिंपरी : दारू पीत असताना झालेल्या किरकोळ वादातून ज्येष्ठ नागरिकाला दगडाने मारहाण करण्यात आली. हा प्रकार शनिवारी दुपारी देहूरोड येथे घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदीप कंचन शर्मा (वय ५४, रा. निगडी) याला अटक केली आहे. मरीयप्पा हनुमंत हिरेदमठ असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेले मरीयप्पा आणि आरोपी हे एका रूममध्ये दारू पीत बसले होते. त्यावेळी दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी आरोपीने रागाच्या भरात तुला मारून टाकेन, असे म्हणत मरीयप्पा यांना दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. देहूरोड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

लग्नास नकार दिल्याने महिलेचा विनयभंग
पिंपरी : लग्नास नकार दिल्याने महिलेचा पाठलाग करीत तिचा विनयभंग करण्यात आला आहे. हा प्रकार दिघी येथे घडला. याप्रकरणी पीडितेने दिघी पोलिस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहीत कांतिलाल भोसले (वय ३४, रा. कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com