शहर शिवसेना नेतृत्वाच्या शोधात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहर शिवसेना नेतृत्वाच्या शोधात?
शहर शिवसेना नेतृत्वाच्या शोधात?

शहर शिवसेना नेतृत्वाच्या शोधात?

sakal_logo
By

शहर शिवसेना नेतृत्वाच्या शोधात?

- राज्यातील घडामोडींचा गैरफायदा
- ‘केडर बेस’ संघटन कोलमडले

पिंपरी, ता. ३० : एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेची (आताची उद्धव बाळासाहेब ठाकरे) चांगलीच ताकद होती. शहरात पक्षाचे आतापर्यंत तीन वेळा आमदार व खासदार निवडून आले. आजही जनमत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. मात्र, राज्यातील बदललेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद शहर संघटनेत उमटले आहेत. ‘केडर बेस’ संघटन असलेला पक्ष कोलमडतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे शहराचे नेतृत्व कोणाकडे राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शहरात शिवसैनिकांचे संघटन चांगले राहिलेले आहे. त्यामुळेच शहरात दिवंगत गजानन बाबर कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना त्यावेळच्या राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मतदारसंघ असलेल्या हवेली विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार व मावळ लोकसभा मतदारसंघातून एक वेळा खासदार झाले. त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे हे दोन वेळा खासदार झाले. तर ॲड. गौतम चाबुकस्वार हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून एक वेळा आमदार झाले.

एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आता भाजपचा वरचष्मा असलेल्या या शहरात शिवसेनेने कायम आपली एक वेगळी ताकद अबाधित ठेवलेली आहे. कुठलेही आमिष अथवा लालच न ठेवता केवळ आदेश पाळून काम करणारे शिवसैनिक ही खरी शिवसेनेची जमेची बाजू. या शिवसैनिकांच्या जिवावरच या शहरातील नेत्यांनी राजकारण केले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना या शहरातही दुभंगली गेली आहे. खासदार बारणे मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मधील अनेक पदाधिकारी बारणेंबरोबर शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात जे स्थानिक नेते आहेत, ते फारसे अंगझटून काम करताना दिसत नाहीत. शिवसेना संपर्क नेते खासदार संजय राऊत यांना त्यांच्या व्यस्ततेतून शहरात वेळ द्यायला मिळत नाही. शिवसेनेची मुंबईतील नेतेमंडळी म्हणजे संपर्कप्रमुख सचिन अहीर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर हे आकुर्डीतील शिवसेना भवनला आले की थोडीफार पदाधिकारी व शिवसैनिकांची गर्दी होते. नेते गेली की पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होते. याबाबत शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

शिवसेनेचा चेहरा हरवतोय का?
शहरात शिवसेनेचा चेहरा म्हणून नेतृत्व विकसित झालेले नाही. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढल्यानंतर आता शिवसेनेचे महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे भोसरीपुरतेच लक्ष घालतात. तर एकेकाळी गजानन बाबर यांना टक्कर देत माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांच्याबरोबरीने काम केलेले व विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शहरात संघटन बांधलेले रामभाऊ उबाळे आता थोडे अलिप्त झाले आहेत. पक्षाच्या बैठकांना युवा सेना, महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती नसते. त्यामुळे शहरात संघटनेची पुन्हा बांधणी करावी लागणार असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे.

सर्वांची मोट बांधणारे नेतृत्व हवे!
शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले व माजी आमदार, जिल्हाप्रमुख (मावळ लोकसभा) ॲड. गौतम चाबुकस्वार कार्यरत आहेत. परंतु, त्यांना अद्याप शहरात संघटन बांधण्यात म्हणावे तसे यश आलेले दिसत नाही. स्थानिक व बाहेरचे हा वाद शहरातील राजकारणात असल्याने त्यांना थोड्या मर्यादा आहेत. मध्यंतरी भोसले यांच्या शिफारशीने रोमी संधू यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर चाबुकस्वार गट नाराज होता. त्यामुळे चाबुकस्वार गटपक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार
घेऊन गेला. त्यावेळी चाबुकस्वार यांना जिल्हाप्रमुखपदी नियुक्त करण्यात आले. परंतु, शिवसेनेला शहर नेतृत्वासाठी तरुण, आक्रमक व स्थानिकांसह सर्वांनाबरोबर घेऊन मोट बांधणारा ‘चेहरा’ हवा आहे, अशी चर्चा जुन्या शिवसैनिकांमध्ये आहे.

‘‘पिंपरी, चिंचवड व वडगाव मावळ या तीन विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणीच्या बैठका दररोज सुरू आहेत. मतदारसंघातील सर्व शहर व गावांमध्ये गटप्रमुख व बूथ प्रमुख नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. जुने लोक अन्य पक्षात गेलेत, त्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पक्ष बांधणीचे पिंपरी विधानसभेतील ७० टक्के व चिंचवड विधानसभेतील ५० टक्के काम झाले आहे. मावळात सध्या काम सुरू आहे. महिला संघटिका, युवा सेना पदाधिकाऱ्यांची नेमणुका करण्याचे काम लवकरच सुरू होईल. त्यांच्या मुलाखती घेणार आहोत. संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी आजच याबाबत आढावा बैठक घेतली.’’
- ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)