
गुन्हे वृत्त
लोगो ः गुन्हे वृत्त
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता. २७) वासुली एमआयडीसी येथे दुपारी हा अपघात झाला.
भूषण नवनाथ गायकवाड (वय २०, रा. शिंदेगाव, खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार सुभाष पवार यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार टेम्पोवरील चालकावर गुन्हा दाखल झाला. भूषण हे दुचाकीवरून वासुली एमआयडीसीतून जात होते. त्यावेळी आरोपी चालवत असलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये भूषण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.
डंपरची धडक लागून सायकलस्वार ठार
चिखली ः भरधाव डंपरने धडक दिल्याने सोळा वर्षीय सायकलस्वार मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. ३०) सकाळी दहाच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे घडली. धीरज प्रदीप निकम (वय १६, रा. पंचनगर कॉलनी, जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी डंपरचालक ज्ञानदेव गोपाळ पवार (वय ५५) याला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक राजेंद्र बर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज निकम हा दहावीत शिक्षण घेत होता. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास तो सायकलवरून जात होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्याच्या सायकलला धडक दिली. यामध्ये धीरजचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डंपर चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.
पंचांच्या निर्णयाने दोन गटात राडा
दिघी ः क्रिकेट सामना सुरू असताना पंचांनी ‘नो बॉल’ दिला. खेळाडूंनी पंचांना जाब विचारला असता, पंचांनी खेळाडूंना मारहाण केली. त्यानंतर खेळाडूंनी पंचांची बाजू घेणाऱ्या गटातील तरुणांना मारहाण केली. हा प्रकार रविवारी (ता. २८) दिघी येथे घडला. यासीन आशिष चिट्टपरम (वय २४, रा. दिघी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बापू परांडे (वय ३२, रा. परांडे होम्स, दिघी) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. फिर्यादी यांच्यासह अन्य काही मुले शनिवारी रात्री दिघी येथील मैदानात क्रिकेट खेळत होते. याच्या परस्परविरोधात गुलाब बबन परांडे (वय ३५, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, पप्या चिट्टपरम (वय २२), रोहित उदयराज सिंग (वय २१), यासीन चिट्टपरम (वय २२, सर्व रा. दिघी) आणि दोन अनोळखी व्यक्तींच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास दिघी पोलिस करीत आहेत.
विशाखापट्टणममधून आणलेला गांजा जप्त
महाळुंगे ः विशाखापट्टणम येथून विक्रीसाठी आणलेला १५ किलो गांजा पोलिसांनी सापळा लावून जप्त केला. रविवारी (ता. २५) अमली पदार्थविरोधी पथकाने खेड तालुक्यातील सुपे गाव येथे ही कारवाई केली. विकास रोहिदास बदाले (वय २७, रा. तळेगाव एमआयडीसी), शिवाजी वसंत भोसले (वय ३६, करंजविहिरे), लक्ष्मण निवृत्ती कुंभार (वय ३७, अंबोली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय विशाखापट्टणम येथील एक व्यक्ती (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्यावरही गुन्हा दाखल झाला. पोलिस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे यांना माहिती मिळाली की, सुपे गावातील मुक्ताई मंदिरासमोर तीनजण गांजा विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. आरोपी विकास आणि शिवाजी यांच्या ताब्यात दोन लाख ५२ हजार १५० रुपयांचा १० किलो ८६ ग्रॅम वजनाचा गांजा, तर आरोपी लक्ष्मणकडून एक लाख ३४ हजारांचा पाच किलो ३६४ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण तीन लाख ८६ हजार २५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. विकास आणि शिवाजी यांनी विशाखापट्टणम येथील चौथ्या साथीदाराकडून गांजा घेतल्याचे कबूल केले. या कारवाईत पोलिसांनी तीनही आरोपींकडून एकूण चार लाख एक हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.
साखरपुडा झालेल्या तरुणाकडून लैंगिक छळ
दिघी ः साखरपुडा झालेल्या तरुणाने तरुणीचा लैंगिक छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेत लग्नाला नकार दिल्याचा प्रकार जून २०२२ ते १३ मे २०२३ या कालावधीत दिघी येथे घडला. याप्रकरणी पीडित तरुणीने दिघी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २९) फिर्याद दिली. त्यानुसार विकास राजेंद्र पवार (वय २८), बाळू राजेंद्र पवार यांच्यासह तीन महिला आरोपींवर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी तरुणीचा आरोपी विकास याच्याशी ५ मे २०२० रोजी साखरपुडा झाला. आरोपीने तरुणीला जबरदस्ती लॉजवर नेले. लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर फिर्यादीने लग्नाची मागणी केली. त्यावेळी आरोपीने तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेत लग्नाला नकार दिला. २२ एप्रिल रोजी आरोपी महिलेने तरुणीच्या हातावर खलबत्ता मारून हात फ्रॅक्चर केला. इतर महिला आणि आरोपी बाळू पवार यानेदेखील तरुणीला शिवीगाळ करीत मारहाण केली. दिघी पोलिस तपास करीत आहेत.
कारने चिरडल्याने श्वानाचा मृत्यू
वाकड ः कारने चिरडल्याने सोसायटीतील श्वानाचा मृत्यू झाला. यातून झालेल्या भांडणातून वाकड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला. हा प्रकार कस्पटेवस्तीतील प्रिस्टीन ग्रँडिअर सोसायटीत रविवारी (ता. २८) घडला. अंकित सुरेंद्र गुप्ता (वय ३३, रा. कस्पटे वस्ती) यांनी वाकड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेवर प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. सोसायटीने शेरू नावाचे श्वान पाळले होते. शेरू सोसायटीच्या गेटजवळ रस्त्यावर झोपला होता. त्यावेळी सोसायटीत राहणारी आरोपी महिलेने कारने शेरूला चिरडले. सोसायटीच्या वॉचमनने महिलेला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी महिला तशीच कार घेऊन पुढे निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याच्या परस्पर विरोधात संबंधित महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार, अंकित गुप्ता व दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला. महिलेच्या फिर्यादीनुसार, शेरू फिर्यादींच्या कारखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पहात असताना आरोपींनी ‘गाडीखाली कुत्रा आला, तरी तुला कळले नाही, दारू पिऊन गाडी चालवत होतीस का?’ असे म्हणत फिर्यादींना ढकलून दिले. तसेच, पोलिस ठाण्यात गाडी घेण्यास सांगत शिवीगाळ केली. यावरून वाकड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.
किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार
तळेगाव दाभाडे ः आईला शिवीगाळ करणाऱ्यास जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर चाकूहल्ला केला. ही घटना रविवारी (ता. २८) रात्री साडेदहाच्या सुमारास तळेगाव दाभाडेतील रणजितसिंह दाभाडेनगर येथे घडली. अंकुश रमेश कांबळे (रा. रणजितसिंह दाभाडेनगर, तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सूरज नागनाथ तुपसुंदर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. रविवारी रात्री फिर्यादी कांबळे त्यांच्या मित्रासोबत घरी जेवण करीत होते. त्यावेळी आरोपी सूरज याने फिर्यादींच्या आईला शिवीगाळ केली. याचा फिर्यादी यांनी जाब विचारला. त्यावरून सूरज याने फिर्यादींच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, धमकी आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.