डॉ. श्रीमंत कोकाटे, कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. श्रीमंत कोकाटे, कोल्हापूर
डॉ. श्रीमंत कोकाटे, कोल्हापूर

डॉ. श्रीमंत कोकाटे, कोल्हापूर

sakal_logo
By

स्वातंत्र्याचा अरुणोदय
--------------------------
मध्ययुगीन काळात शूद्रातिशूद्रांनी राज्याभिषेक करणे, राजा होणे, नेतृत्व करणे, या संकल्पना खूप कठीण होत्या. येथील कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्‍य जातींनी फक्त कष्ट करायचे, लढायचे, पण प्रतिनिधित्वाचे स्वप्न पाहावयाचे नाही, हा तो काळ होता. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करतात, ही एक महान, क्रांतिकारक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायक घटना आहे. शिवराज्याभिषेकाने स्वराज्यात स्वातंत्र्याचा अरुणोदय झाला.
-डॉ. श्रीमंत कोकाटे, कोल्हापूर

आ ज आपण संसदीय लोकशाहीत आहोत. आपल्या संविधानाने अनेक हक्क-अधिकार दिलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला (१८ वर्षे पूर्ण केलेल्या) मतदानाचा अधिकार आहे, तसेच विहित अटी पूर्ण करणारांना निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधानपदी कोणत्याही जातिधर्माचा व्यक्ती निवडला जातो. विद्यमान राजपद हे वंशपरंपरेने किंवा वारसाने नव्हे, तर कर्तृत्वाने आणि लोकनियुक्त आहे. मात्र, मध्ययुगीन काळात शूद्रातिशूद्रांनी राज्याभिषेक करणे, राजा होणे, नेतृत्व करणे, या संकल्पना खूप कठीण होत्या. येथील कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्‍य जातींनी फक्त कष्ट करायचे, लढायचे, पण प्रतिनिधित्वाचे स्वप्न पाहावयाचे नाही, हा तो काळ होता. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करतात, ही एक महान, क्रांतिकारक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायक घटना आहे. दबलेल्या, पिचलेल्या, हताश, नाउमेद झालेल्या एतद्देशीयांना नवचैतन्य देणारी ही घटना आहे. सभोवताली मोगल, आदिलशाह, पोर्तुगीज, इंग्रज, कुतुबशहा राज्य करीत होते. पण तो अधिकार एतद्देशीयांना नव्हता, तो महत्प्रयासाने मिळविण्याचे क्रांतिकारक कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यामुळेच त्यांचा समकालीन असणारा कृष्णाजी अनंत सभासद ‘हा मऱ्हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य जाली नाही. शिवराज्याभिषेक ही असामान्य घटना आहे,’ असे म्हणतो.

शूर, पराक्रमी
मध्ययुगीन काळात राज्यकारभार, पत्रव्यवहार, तह, करार, न्यायदान, चलनव्यवस्था, कृषिकायदे, करप्रणाली, संरक्षण, दळणवळण इत्यादी कार्य करण्यासाठी राज्याभिषेक अत्यावश्‍यक होता. जोपर्यंत राज्याभिषेक नव्हता, तोपर्यंत शिवरायांनादेखील सरदाराचा पुत्र, जमीनदार, वतनदार असेच संबोधले जात असे. भारतात अनेक सरदार, वतनदार होते. ते शूर, पराक्रमी, उत्तम प्रशासक होते. तरीदेखील ते कोणत्यातरी केंद्रीय सत्तेचे मांडलिक होते. त्यांना सर्वाधिकार नव्हते. त्यामुळे त्यांची प्रजा आणि ते स्वतंत्र नव्हते. शिवराज्याभिषेकाने स्वराज्यात स्वातंत्र्याचा अरुणोदय झाला. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. त्यांच्या राज्याभिषेकाला अनेक अडचणी आल्या, त्यावर त्यांनी मात केली. त्यांच्या अत्यंत कणखर आणि दूरदृष्टीच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवाजीराजे संकटसमयी लढणारे होते, रडणारे नव्हते. ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

सभासदांच्या मते...
राज्याभिषेक प्रसंगीचे वर्णन प्रत्यक्षदर्शी कृष्णाजी अनंत सभासद यांनी अत्यंत रसाळ, अतिरंजित, लालित्यपूर्ण, अतिशयोक्त भाषेत केलेले आहे. त्यातील अतिशयोक्त भाग वजा केला, तर त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. वाराणसीचे थोर पंडित गागाभट्ट हे शिवराज्याभिषेकासाठी आले. शिवाजीराजांनी चार पातशाह्या दाबल्या. अनेक किल्ले जिंकले. पाऊण लाख घोडा लष्कर निर्मिले. त्यामुळे त्यांना राज्याभिषेक व्हावा, त्यासाठी पूर्ण नियोजन केले. अनेक मातब्बर लोक बोलाविले. बत्तीस मण सोन्याचे सिंहासन निर्मिले. राज्याभिषेक रायगडावर यथाविधी पार पडला. सभासदाने राज्यभिषेकाचे प्रदीर्घ वर्णन केलेले आहे. ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा उल्लेख फक्त सभासदांनी केला आहे. ते सांगतात की, ‘हा मऱ्हाठा पातशाहा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ मध्ययुगीन शिवकाळात मऱ्हाटा पातशाहा ही संकल्पना होती. हिंदू पातशाहा ही संकल्पना नव्हती, हे स्पष्ट होते. मराठा ही संकल्पना जातिवाचक नव्हे, तर समूहवाचक होती. सर्व जाती-धर्मीयांचा अर्थात रयतेचा राजा होय.

ऑक्‍सिंडेनच्या मते...

राज्याभिषेकाचे वस्तुनिष्ठ वर्णन करणारा दुसरा महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी म्हणजे इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्‍सिंडेन. हा राज्यभिषेकाला रायगडावर हजर होता. तो लिहितो की, ‘सहा जून १६७४ रोजी सात किंवा आठच्या सुमारास मी दरबारात गेलो. शिवाजीराजे एका भव्य सिंहासनावर बसले होते. सरदार, अधिकारी, प्रतिनिधी त्यांच्या समोर बसले होते. पुत्र संभाजीराजे व इतर मंत्री मानानुसार स्थानापन्न झाले होते.’ शिवाजीराजांनी हेन्रीला व नारायण शेवणीला जवळ बोलावले. हेन्रीने शिवरायांना मुजरा करून हिऱ्याची अंगठी भेट दिली. त्याप्रसंगाचे व त्या ठिकाणी केलेल्या सजावटीचे इत्थंभूत वर्णन हेन्री ऑक्‍सिंडेनने केलेले आहे. राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर हत्ती, घोडे कसे आणले असतील? याचे आश्‍चर्य हेन्री ऑक्‍सिंडेन व्यक्त करतो. अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना आश्‍चर्य वाटावे आणि त्यांनी रायगडावर येऊन शिवरायांना मुजरा करावा, हे शिवराज्याभिषेकाचे महत्त्व आहे.

राजे छत्रपती झाले...
राज्याभिषेकाने शिवाजी महाराज अधिकृत ‘राजा’ झाले. ते छत्रपती झाले. राज्यकारभार करण्याचा त्यांना अधिकार मिळाला. राज्याभिषेकाने त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. रयतेला राजा मिळाला. हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट झाली. हा राजकीय स्वातंत्र्याचा उद्‌घोष होता. नाउमेद झालेल्या प्रजेला राज्यकर्ता होण्याचा आत्मविश्‍वास राज्याभिषेकाने मिळाला. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी स्वतःचा शिवशक सुरू केला. राज्याभिषेकाने शिवाजी महाराज शककर्ते झाले. त्यांनी स्वतःची चलनव्यवस्था सुरू केली. शिवराज्याभिषेकाचा रयतेला आनंद झाला. मातोश्री जिजाऊ कृतार्थ झाल्या. शहाजीराजे-जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. या राज्याभिषेकाला एकूण एक करोड बेचाळीस लाख होन इतका खर्च झाला, असे सभासद सांगतात. हा पहिला राज्याभिषेक होय. त्यानंतर २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवरायांनी दुसरा तांत्रिक राज्याभिषेक निश्‍चल पुरी यांच्या पौरोहित्याखाली केला. शिवराज्याभिषेक ही घटना भारताच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना आहे. ती धार्मिक स्वातंत्र्याची पहाट आहे.