
मोरवाडी आयटीआयचे २४ विद्यार्थी बारावी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
पिंपरी, ता. ९ ः बहुराष्ट्रीय कंपन्यांना कुशल मनुष्यबळांची आवश्यकता असते. त्यासाठी व्यवसाय शिक्षणाबरोबर कोणत्याही पदवीची गरज आहे. त्यामुळे कौशल्य विकास विभागाच्या प्रस्तावानुसार शालेय शिक्षण विभागाने आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना दहावी व बारावीची समकक्षता देण्याबाबतच्या धोरणांचा निर्णय जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) २५ प्रशिक्षणार्थींनी बारावी समकक्षेतेसाठी आवश्यक असलेली राज्य मंडळाची परीक्षा दिली. त्यात २४ प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले. प्राचार्य शशिकांत पाटील यांच्या प्रयत्नांतून संस्थेने राज्य परीक्षा मंडळाचा संकेतांक प्राप्त केला आहे. त्यानंतर प्रशिक्षणार्थींचे परीक्षा अर्ज भरणे, ते राज्य मंडळाच्या कार्यालयात जमा करणे, प्रशिक्षणार्थींना अभ्यासक्रमाबाबत अवगत करून देणे, अशी प्रक्रिया केली होती.
---