
आरटीईच्या तब्बल नऊशेहून अधिक जागा रिक्त
पिंपरी, ता. १० ः शहरातील मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शैक्षणिक वर्षासाठीचे २५ टक्के आरक्षण जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये ३२८१ जागांपैकी आत्तापर्यंत २०२३ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यापैकी अद्याप ९०८ जागा रिक्त आहेत. या जागांसाठी प्राधान्य क्रमानुसार प्रवेश देण्यात येत आहेत. यामध्ये आकुर्डी उन्नत केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये २१८५ पैकी १५८१ जागांवर प्रवेश देण्यात आला आहे. तर पिंपरी उन्नत केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या १०९६ पैकी ७९२ जागांवर प्रवेश देण्यात आला आहे. यावर्षी फेब्रुवारी मध्ये सुरू करण्यात आलेली प्रवेशप्रक्रिया अद्यापही सुरू आहे. तरीही आरटीई प्रवेशाच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. आरटीई प्रवेशास १२ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या प्राधान्यक्रम फेरी सुरू आहे. शाळा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या अवधीमध्ये बऱ्याचशा जागांवर प्रवेश निश्चित होतील.
कागदपत्रांचा अभाव ः
- कागदपत्रांची पूर्तता करण्यास पालकांनी विलंब केल्यामुळे बरेचसे विद्यार्थी प्रवेशास मुकले आहेत. पालक गावाकडे असल्यामुळे काही पालकांकडे जात प्रमाणपत्र, दाखले नाहीत. तसेच घरच्या पत्त्यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता नाही. बऱ्याच पालकांकडे रजिस्टर नोंद असलेल्या भाडे करारनाम्याची पूर्तता करता आली नसल्याने पहिल्या फेरीत नंबर लागूनही केवळ कागदपत्रांमुळे प्रवेशाला मुकावे लागत आहे.
‘‘रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी देण्यात येईल. अनेकवेळा पालक मराठी माध्यमांच्या शाळा टाळतात. त्यामुळे रिक्त जागा राहतात.’’
-संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग