मतदार चिठ्ठी घरोघरी जावी
पिंपरी, ता. ३१ ः मतदारांना घरपोच मतदार चिठ्ठी (व्होटर स्लीप) मिळत नाही, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांबाहेर संबंधित कर्मचाऱ्यांकडून मतदार चिठ्ठी घेण्यासाठी शोधाशोध करावी लागते, संबंधित कर्मचारी अनेकदा उपस्थित नसतात, मतदान नेमके कुठे आहे? हे शोधण्यासाठी अधिक वेळ लागतो, ‘आमची मतदार चिठ्ठीच नाही’ अशा तक्रारी असतात, अनेकांना मतदान करता आले नव्हते, या सर्व बाबी मतदानाचा टक्का घटण्यास कारणीभूत ठरल्याचे यापूर्वीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी आढळून आले आहे. हे सर्व टाळण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या तारखेपूर्वी मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोचविणे आवश्यक आहे.
विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र, २०१४, २०१९ व २०२४ची लोकसभा आणि २०१४, २०१९ची विधानसभा आणि २०२३ची चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये चिंचवड, पिंपरी, भोसरी मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ६० पेक्षा अधिक गेलेलीच नाही. त्यात सुधारणा करण्यासाठी व मतदानाचा टक्का वाढीसाठी चिंचवड, पिंपरी, भोसरी विधानसभा मतदारसंघ स्तरावर वेगवेगळे उपक्रम संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत राबविले जात आहेत. निवडणूक आयोगानेही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मतदारांपर्यंत मतदारचिठ्ठी पोहोचविणे; कंपन्या, सोसायट्या, बाजारपेठा, मॉल्स, नाट्यगृह, सांस्कृतिक सभागृहे, विविध कार्यक्रम, मजूर अड्डे आदी ठिकाणी जाऊन मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जागृती केली जात आहे. त्यांना मतदान करण्याबाबत शपथ दिली जात आहे.
लोकसभा निवडणूक वेळेची प्रातिनिधिक उदाहरणे
चिंचवड ः पुनावळेतील एकाच गृहनिर्माण सोसायटीतील काही मतदारांची नावे चिंचवड मतदारसंघातील केंद्रावर आणि काहींची नावे भोर-वेल्हे मतदारसंघातील ताथवडे येथील मतदान केंद्रावर आल्याचे आढळले होते
पिंपरी ः अजमेरा कॉलनीतील एका कुटुंबातील चार जणांची नावे मतदार यादीत होती, मात्र, कुटुंब प्रमुखाचे नावच नसल्याने त्यांना मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करता आले नव्हते
भोसरी ः चोविसावाडीतील एका केंद्रावरील मतदारांना मतदार चिठ्ठी देणारा कर्मचारी सकाळी नऊ वाजेपर्यंत आलेला नव्हता, त्यामुळे मतदारांना ताटकळत थांबावे लागले, काहीजण मतदान न करताच निघून गेले होते
काय करायला हवे
- मतदारांना घरपोच मतदार चिठ्ठी मिळावी (अनेक कर्मचारी चिठ्ठी पोहोचवत नाहीत)
- अतिऊन, पावसाची शक्यता गृहित धरून उपाययोजना कराव्यात (वीजपुरवठा खंडित होऊ शकतो)
- ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था, व्हिलचेअरची सुविधा असावी
- मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी
- मोबाईलमधील मतदार चिठ्ठी ग्राह्य धरावी (मोबाईल बंदी असल्याने वाद झाले होते)
- मतदार यंत्रात बिघाड झाल्यास त्वरित पर्यायी व्यवस्था असावी (पिंपरी, निगडीत प्रकार घडला होता, मतदान थांबले होते)
‘‘मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार चिठ्ठी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्यासाठी आरोग्यासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्यासह विविध सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे. मतदार चिठ्ठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी अतिशय सूक्ष्म पातळीवर नियोजन केले आहे.
- अर्चना यादव, निवडणूक निर्णय अधिकारी, पिंपरी
‘‘मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करण्यात अडचण येऊ नये, मतदान प्रक्रिया सुलभ व सहजपणे पार पडावी. मतदानाचे
प्रमाण वाढावे, यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवीत आहे. सर्व केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा असतील. रांगेत उभे राहण्याऐवजी मतदारांना बसण्यासाठी केंद्रांवर खुर्च्या व बेंचची व्यवस्था असेल. त्यांना पिण्याचे पाणी जागेवर मिळेल.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

