रामकृष्ण मोरे यांच्यानंतर कॉंग्रेसला उतरती कळा नेत्यांच्या अनास्थेमुळे पिंपरी चिंचवड शहरातून कॉंग्रेस नेस्तनाबूत
जयंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३१ : एकेकाळी पिंपरी चिंचवड महापालिका व शहर कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी शालेय शिक्षण मंत्री दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या काळात कॉंग्रेस सातत्याने महापालिकेत सत्तेत राहिली. परंतु; त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे शहरातील कॉंग्रेसचे नेतृत्व आले. स्वत:च्या मतदारसंघाचा विचार करत राष्ट्रवादी कॉंग्रेस नेतृत्वाबरोबर वैर अथवा त्यांची वक्रदृष्टी नको म्हणून प्रा. मोरे यांच्यानंतरच्या प्रत्येक नेत्यांनी पक्षवाढीसाठी आखडता हात घेतला. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कॉंग्रेस कुमकुवत होत गेली. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या जागा वाटपात कॉंग्रेसला एकही जागा न मिळाल्यामुळे कॉंग्रेस पुन्हा बॅकफूटला गेली आहे. प्रदेश स्तरावर भांडून पदरात जागा पाडून घेणाऱ्या नेत्याचा अभाव असल्यामुळे व नेत्यांच्या अनास्थेमुळे शहरातून कॉंग्रेस नेस्तनाबूत झाल्याची चर्चा कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत १९८६ ते १९९७ या काळात प्रा. मोरे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची एक हाती सत्ता होती. १९९१ च्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या माध्यमातून अजित पवार यांनी शहराच्या राजकारणात प्रवेश केला. तर; १९९५ ला प्रा. मोरे यांचा हवेली विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसमध्ये दोन गट पडून महापालिकेत व शहरातील राजकारणात अजित पवार यांनी बारकाईने लक्ष घालायला सुरवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली तरीही शहरात कॉंग्रेस तुल्यबळ ठेवण्यात प्रा. मोरे यांना यश आले होते. महापालिकेच्या २००२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ३६ व कॉंग्रेसला ३४ जागा मिळून दोन्ही कॉंग्रेसनी आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. राज्यातील मंत्रिपद टिकविण्यासाठी प्रा. मोरे यांनीही महापालिकेत दुय्यम दर्जाची उपमहापौर, पीसीएमटी सभापती अशी पदे घेतली.
दरम्यान, २००३ मध्ये प्रा. मोरे यांचे निधन झाल्यानंतर शहर कॉंग्रेस खऱ्या अर्थाने पोरकी झाली. त्यानंतर नेतृत्व केलेल्या सुरेश कलमाडी व हर्षवर्धन पाटील यांना शहराची नस पकडून कॉंग्रेस वाढवता आली नाही. याचा फायदा घेत सगळे नगरसेवक अजित पवार यांनी आपल्याकडे समाविष्ट करुन घेतले. शहरात कॉंग्रेसची मतपेढी असताना सक्षम नेतृत्व नसल्यामुळे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही.
प्रदेशस्तरावर भांडणाऱ्या नेत्याचा अभाव
विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरु असताना शहरात कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नसल्यामुळे एकही जागा सुटणार नाही, हे गृहीतच होते. परंतु; कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्यासह स्थानिक नेत्यांना आत्मविश्वास नसल्यामुळे चर्चेत सुटलेली चिंचवडची जागा परत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेली. ‘ही जागा अडचणीची आहे. आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही.’ , असे सांगत प्रदेश पातळीवरील नेत्यांनी त्यांना हव्या असणाऱ्या व विजयी होऊ शकतील अशा अन्य जागा पदरात पाडून घेतल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. त्यामुळे शहरात एकही जागा कॉंग्रेसला मिळाली नाही. प्रा. मोरे यांच्यासारखा खमक्या नेता शहर कॉंग्रेसकडे असता तर; निश्चितच वेगळे चित्र दिसले असते, अशी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भावना आहे.
सध्याही पक्षात दोन प्रवाह
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी स्थानिक पातळीवर पिंपरीची जागा मागत असल्याचे सांगत प्रत्यक्षात चिंचवड कॉंग्रेसला सोडवून घ्या, असा ठराव करत प्रदेशकडे पाठविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढल्यास भवितव्य आहे, हे लक्षात घेऊन काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या कामाला सुरवात केली आहे. तर; जबाबदार पदाधिकारी अजून प्रचारासाठी बाहेर पडले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या पक्षात सक्रिय व स्थिर असे दोन प्रवाह सध्या दिसून येत आहेत. याबाबत शहराध्यक्ष कैलास कदम यांच्याशी संपर्क साधला ते उपलब्ध झाले नाहीत.
......
फोटोः 59653, 59652
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

